आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Supply Disturb, But Politics In Municipality

पाणीपुरवठा विस्कळीतच, मनपात मात्र राजकारणालाच दिले प्राधान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - पंधरादिवस झाले शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात पोहोचले. बंधारा भरला. परंतु महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेत ताळमेळ नाही. त्यामुळे हद्दवाढ भागासह गावठाण भागातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. अनेक भागात सात ते दहा दिवस झाले तरी नळाला पाणी नाही. शहरात पाणीपुरवठ्याचा दुष्काळ सुरू असताना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसूतक नसल्याचे बुधवारी दिसून आले. महापालिका सभेत पाणीप्रश्नात राजकारण आणून सभागृहातील चर्चा उधळून लावण्यात आली.
पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सत्ताधारी नगरसेवक राजकुमार हंचाटे आणि आरिफ शेख यांच्या प्रभागातील नागरिक पाणीप्रश्नी जाब विचारण्यासाठी महापालिकेत दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी नगरसेवकांनी मात्र राजकारण करत सभागृहातील चर्चा उधळून लावली. त्यामुळे संतापलेल्या भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी हातातील पेल्यातील पाणी अधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावले आणि पेला जमिनीवर आदळला. जिल्हाधिकारी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करू शकतात तर आयुक्त का नाही, असा सवाल केला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांना महापौर कक्षात बोलावले आणि पाणी प्रश्नावर जाब विचारला. दरम्यान, आयुक्तांच्या कक्षात युतीच्या नगरसेवकांनी दोन तास ठिय्या धरत समान पाणी वाटपाची मागणी केली.
नगरसेवकांच्याविरोधात नागरिकांच्या घोषणा : पाणी आले नाही म्हणून नगरसेवक राजकुमार हंचाटे, संजीवनी कुलकर्णी, आरिफ शेख आणि अश्विनी जाधव यांच्या प्रभागातील नागरिक महापालिकेत आले. हंचाटे आणि कुलकर्णी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. हंचाटे यांनी नागरिकांची भेट आयुक्तांशी घडवून आणली. त्यानंतर नागरिक परतले.
आयुक्त कार्यालयात युतीच्या नगरसेवकांचा ठिय्या : आयुक्तांच्या कक्षात युतीच्या नगरसेवकांनी ठिय्या मारला. त्यांच्यासोबत आयुक्तही बसले. दीड तास चर्चा झाली. पाण्याबाबत नगरसेवकांच्या अडचणी जाणून घेतल्या. बोअर दुरुस्तीचे मक्तेदार काम करत नसल्याने त्यांच्या थकीत रकमेपैकी ३० लाख रुपये देण्याचे आयुक्तांनी मान्य केले.
नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही, आज बैठक : पाण्याचा प्रश्न जनतेचा आहे. त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे, असे मत नगरसेवक मनोहर सपाटे, बेरिया यांनी व्यक्त केले. गुरुवारी सकाळी अकरा वाजता महापौर आबुटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

मुख्यलेखापाल गोडगेंना सुनावले : मुख्यलेखापाल सुकेश गोडगे हे महापौर आबुटे यांचा फोन उचलत नाहीत, असा मुद्दा उपस्थित झाला. हा प्रकार म्हणजे महापौरांचा अपमान असल्याचे सांगत, बेरिया यांनी गोडगे यांना खडेबोल सुनावले. या वेळी आयुक्त काळम -पाटील यांनीही गोडगे यांना धारेवर धरले.