आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... अखेर देऊळगाव बंधाऱ्यात सोडले पाणी; बळीराजा सुखावला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा - तालुक्यातील निम्न खैरी पांढरेवाडी प्रकल्पातून नियमांची पायमल्ली करून हेड टू टेल पाणी सोडल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. देऊळगाव, जगदाळवाडी परिसरातील खैरी नदी काठावरील शेतकऱ्यांची पिके करपायला लागली होती. यामुळे टेल टू हेड पाणी सोडावे, अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा देताच सोमवारी (दि.१०) पाणी सोडण्यात आले.
 
खैरी नदीवरील निम्न खैरी पांढरेवाडी प्रकल्प सन २०१६ मध्ये प्रथमच १०० टक्के भरला. या प्रकल्पातून १५ मार्च २०१७ रोजी खैरी नदीपात्रात कुंडलिका प्रकल्प उपविभाग परंडा यांनी पाणी सोडले. शासकीय नियमानुसार ‘टेल टु हेड’ पाणी सोडून खैरी नदीवरील शेवटच्या देऊळगाव येथील बंधारा भरणे आवश्यक होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी नियमांना बगल देऊन ‘हेड टू टेल’ प्रकाराने बंधाऱ्यातून पाणी सोडले.
 
सोडलेले पाणी शेवटच्या बंधाऱ्यात येण्यासाठी जून महिना उजाडणार असल्यामुळे देऊळगाव, जगदाळवाडी परिसरातील पिके पाण्याअभावी करपत चालली होती.
यामुळे बाजार समितीचे सभापती ॲड. संतोष सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि.७) तहसीलदार संबंधित विभागास निवेदन देऊन धरणे आंदोलन तसेच जलसमाधीचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.
 
जगदाळवाडी, देऊळगाव बंधाऱ्यातून पाणी सोडल्याने पिकांना लाभ होईल.
निम्न खैरी पांढरेवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी बेकायदेशीरपणे वरील बाजूच्या शेळगाव, तांदूळवाडी येथील बंधाऱ्यातच अडवल्यामुळे बंधाऱ्याचे दरवाजे तत्काळ काढून पाणी खाली सोडण्यात यावे. प्रथम देऊळगाव, जगदाळवाडी, तांदूळवाडी, शेळगाव या क्रमवारीने टेल टू हेड जलनीतीनुसार खैरी नदीवरील बंधारे तत्काळ भरून घ्यावेत. नियम मोडून पाणी सोडणाऱ्या अभियंत्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. यामुळे देऊळगाव, जगदाळवाडी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...