आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीचोरीतील निलंबितांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाणीचोरी प्रकरणात निलंबित झालेल्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला. त्यास विरोधकांनीही साथ दिली. त्यामुळे तिघांना कामावर घेण्याचा निर्णय महापालिकेच्या सभागृहाने बहुमताने घेतला. गन्हे दाखल असलेले वाहन चालक ज्योतिबा काकडे, फिटर किसन कापसे आणि पोलिस चौकशीतून वगळलेले उपअभियंता विजय राठोड यांचा समावेश आहे.
सत्ताधाऱ्यांनी तिघांना कामावर घेण्याची सूचना मांडली. विरोधीपक्षाने मात्र राठोड यांना कामावर घेण्यास विरोध करत अन्य दोघांना घेण्यास मंजुरी दिली. काकडे, कापसे यांना न्यायालयीन निर्णयास अधीन राहून तर राठोड यांना कामावर घेण्याचा निर्णय घेतला.
सभा महापौर प्रा. सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उजनी ते सोलापूर यशवंत जलवाहिनीवरून पाणीचोरी होत असल्याने याप्रकरणी २३ २४ जुलै २०१५ रोजी महापालिकेने शोध मोहीम घेऊन १२ ठिकाणी चोरी शोधली. याप्रकरणी २४ शेतकऱ्यांसह मनपा कर्मचारी काकडे, कापसे याच्यावर विरोधात टेंभूर्णी, मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित केले होते. तर याच प्रकरणात राठाेड यांची चौकशी पोलिसांनी केली. पुढे तपासात त्यांना वगळले. या काळात ते महापालिकेत गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांना निलंबित केले होते.

काकडे यांनी पाणीचोरीची माहिती महापालिकेस दिली. त्यांना माफीचा साक्षीदार करतो, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले होते. काकडे यांच्याबाबत सहानभूती दाखवण्याऐवजी त्यांना आरोपी केले. काकडे यांच्याबाबत मनपा प्रशासनाने भूमिका स्पष्ट होत नाही, असे नगरसेवक प्रा. अशोक निंबर्गी म्हणाले. काकडे यांनी माहिती देऊन पाणीचोरी पकडून दिली. त्यामुळे त्यांना सोडावे असे संजय कोळी म्हणाले. राठोड दोषी आहेत. त्यांना परत घेतले तर शासनामार्फत चौकशी लावू असे म्हणत नगरसेवक जगदीश पाटील यांनी टीका केली. राठोड यांना पाठीशी घालू नका. दोषींवर कारवाई करा, असे नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले.
सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी याप्रकरणी विरोधकाचे मुद्दे खोडून काढले. उपअभियंता राठोड यांचे नाव चौकशीत निष्पन्न झाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही आरोप पोलिसांनी ठेवले नाहीत. त्यामुळे त्यांना पाठीशी घालत नाही. आयुक्तांनी प्रस्तावात राठोड यांचे नाव दिले नाही. म्हणून कामावर घेण्याचे सूचनेत नमूद केले, असे स्पष्ट केले.

इतर विषय दहा मिनिटात : इतरविषयांवर चर्चा करता दहा मिनिटात सभा गुंडाळली. राठोड यांची पाठराखण करत असलेल्या नगरसेवक मनोहर सपाटे यांना मधेच थांबवत विषय बहुमताने मान्य केले. चर्चेत नगरसेवक दिलीप कोल्हे, चेतन नरोटे, बिसमिल्ला शिखलगार, नागेश वल्याळ आदी सहभागी झाले.

याच प्रकरणातील शेतकऱ्यांवर चर्चा नाही
पाणीचोरी प्रकरणी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. सुमारे तीन कोटी रूपयांचे चोरी झाल्याची फिर्यादेत नमूद आहे. पाणी चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत मनपा सभागृहात साधी चर्चा केली नाही. पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यावरुन मानपानाचे नाट्य सभागृहात सुरू होते. गुन्ह्यात संशयित आरोपी असलेले काकडे आणि कापसे यांच्यावर चर्चा कमी झाली. तर राठोड यांच्याबाबत जास्त चर्चा झाली.

दूषित पाण्याच्या बाटल्या सभागृहात
प्रभाग क्रमांक एकमधील बुधवार पेठ परिसरात मैलामिश्रित पाणी येत असल्याने तेथील पाणी नगरसेविका सुनीता भोसले यांनी सभागृहात आणले. लक्षवेधीची मागणी केली. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांना दिले.

पाणी चोरीचे नागरिकांवरील गुन्हे मागे घ्या : चंदनशिवे
पाणी चोरी प्रकरणी अधिकाऱ्यांना कामावर घेण्याची सूचना सत्ताधाऱ्यांची अाहे. त्याप्रमाणे शहरातील हजार नागरिकांवर पाणी चोरीचे फौजदारी दाखल केले. दंडाची रक्कम भरणाऱ्या नागरिकांवरील गुन्हे मागे घ्यावे तशी सूचनेत नमूद करा असे नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले.