आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पिवळसर पाण्याचे गूढ काय? आता विशेष पथकाने घेतले नमुने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरात येणाऱ्या पिवळसर पाण्याचे कारण शोधण्यासाठी राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशेष पथक नियुक्त केले आहे. त्यात आयआयटी पवई येथील शास्त्रज्ञांसह मुंबई पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी पहाटे तीन वाजता हे पथक दाखल झाले. शनिवारी दुपारी आैज बंधारा, टाकळी येथील जॅकवेल सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचे नमुने घेण्यात आले. दरम्यान, रविवारी (दि. ३) मुख्य प्रयोगशाळेचे वरिष्ठ वैज्ञानिक सुभाष कांबळे सोलापुरात येणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही कारखान्यांच्या परिसराची पाहणी केली होती. मात्र, पिवळसर पाणी नदीपात्रातील माशांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नाही. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कानउघाडणी केली होती.

दरम्यान, शनिवारी पहाटे विशेष पथक सोलापुरात दाखल झाले. या पथकाला शुक्रवारी अचानकपणे सोलापूरला जाण्यास सांगण्यात आले. आयआयटी पवई येथील शास्त्रज्ञ राजदीप पांडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई कार्यालयाचे उपप्रादेशिक अधिकारी डॉ. प्रकाश मुंढे, क्षेत्रीय अधिकारी विक्रम माने यांचा पथकात समावेश आहे. पांडे यांनी स्वतंत्रपणे पाण्याचे नमुने घेतले आहेत. पाण्याला पिवळा रंग येण्याचे कारण काय? माशांचा मृत्यू कशामुळे झाला, या दोन प्रमुख गोष्टींची तपासणी करण्यात येईल. मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले आहेत. पाणी तपासणीचा अहवाल दोन्ही पथके राज्य शासनाला देणार आहेत. रविवारी (दि. ३) सकाळी हे पथक मुंबईला परतणार असून, दुपारी कांबळे यांचे पथक सोलापुरात दाखल होत आहे. या सर्व पाणी चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर पिवळसर पाण्याचे गूढ उलगडेल अशी आशा आहे. दरम्यान, सोरेगाव रस्त्यावरील नादुरुस्त पाइपची दुरुस्ती केल्यानंतरही शनिवारी गळती सुरूच होती.

पाणी शुद्ध करा अन्यथा पुन्हा आंदोलन करू
पिवळसर पाणी देणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून, शुद्ध पाणी देण्याचे प्रयत्न करावेत. मळीमिश्रित कारखान्यांवर त्वरित कारवाई करावे. तसे झाल्यास आम्ही पुन्हा आंदोलन करू. -सुरेश पाटील, नगरसेवक

आयआयटी शास्त्रज्ञांची स्वतंत्र तपासणी
सोलापुरातील पिवळसर पाण्याचे कारण शोधण्यासाठी आम्हाला पाठवण्यात आले आहे. आयआयटी पवईचे शास्त्रज्ञ स्वतंत्र तपासाणी करणार असून, आम्हीही पाणी नमुने तपासणार आहोत. अहवाल शासनाकडे सादर करण्यात येईल. शनिवारी आम्ही नदी जलशुद्धीकरण केंद्रातील नमुने तपासले आहेत. -डॉ.प्रकाश मुंढे, उपप्रादेशिक अधिकारी, मुंबई

रविवारी दुपारी दुसरे पथक
मुख्यप्रयोगशाळेचे वरिष्ठ वैज्ञानिक सुभाष कांबळे रविवारी दुपारी सोलापुरात येत आहेत. औज, सोरेगावसह शहरातील काही भागातील पाण्याची पाहणी करून नमुने घेणार आहेत. त्यांच्या समवेत महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गंगाधर दुलंगे उपस्थित राहणार आहेत. घटनास्थळांची पाहणी पाणी नमुने घेतल्यानंतर कांबळे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...