आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त सहयोगी राहिलो, पत्नीनेच घर सांभाळले - सुशीलकुमार शिंदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राजकारणात वेगवेगळ्या पदांवर काम करत राहिल्याने सतत कामात व्यस्त. त्यामुळे घराकडे मला फारसे लक्ष देता अालेच नाही. कुटुंब प्रमुख असलो तरी मी कुटुंबाचा सहयोगी राहिलो. खरे घर सांभाळले ते माझ्या पत्नी उज्ज्वला यांनीच. अाणि त्यामुळेच मला सेवा करता अाली, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

श्री. शिंदे आज वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करत आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा आज गौरव होत अाहे. अमृतमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. कौटुंबिक वातावरण, कौटुंबिक जबाबदारी अाणि कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे या विषयावर ते बोलले. या कार्यक्रमासाठी शिंदे यांचे शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पुण्याहून सोलापुरात अागमन झाले. त्यानंतर सकाळी लवकर उठून त्यांनी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू केले. पण शनिवारी सकाळपासूनच जनवात्सल्य बंगल्यावर शिंदे यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी गर्दी झाली होती. सायंकाळीही ती होती. त्यातूनही वेळ काढून त्यांनी संवाद साधला.

ते म्हणाले, घरात मी लक्ष देत होतो. पण सतत व्यस्त राहिल्याने पत्नीनेच घर सांभाळले. मुलींचे शिक्षण, त्यांचा अभ्यास हे काम पत्नीच करीत होती. सहचारिणी असली तरी अापणही तडजोडीचा मार्ग स्वीकारला पाहिजे, ही तिची भावना होती. अामच्यात समन्वयही तेवढाच होता. एक कुटुंब म्हणून एकत्र येण्याचे प्रसंग फारसे कधी अाले नाहीत. मुली लहान वयात खोडकर होत्या. एकमेकीत भांडणेही व्हायची. घरात त्या तक्रारीही करायच्या. मुलींची ती भांडणेही मला सुखावणारी होती. समाधान वाटायचे.

श्री. शिंदे म्हणाले, खरे तर मला कुटुंबाला निवांत असा वेळ देता अालाच नाही. एकत्र कधी चित्रपट पाहायला गेलो नाही. मात्र नाटकाला जाण्याचे प्रसंग क्वचितच अाले. चौपाटीवर जायची इच्छा व्हायची पण ते जमले नाही. विशेष म्हणजे कुटुंबात कुठे बाहेर जायचे म्हणून निर्णय घेतला की अडचणी यायच्या असे अनेकवेळा घडले. १९९२ मध्ये राज्याच्या राजकारणातून दिल्लीत गेलो तेव्हा पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबारी होती. त्यामुळे काही वेळा कौटुंबिक विरंगुळा म्हणून वेळ मिळायचा. त्यावेळी अाम्ही सगळे एकत्र असायचो. कुटुंबाला वेळ देता येत नाही हे मला जाणवत होते, पण कुटुंब हे माझा अाधार होते. डायनिंग टेबलवर एकत्र जेवायला कधी जमले नाही पण सध्या मी, प्रणिती अाणि पत्नी असे ब्रेकफास्टला एकत्र असतो. तेव्हा बरीच चर्चा होते. दुपारचे अाणि रात्रीचे जेवण याचा काही मेळ बसत नव्हता. मला कितीही वाजायचे. अाजही तीच स्थिती अाहे. माझ्या वाटचालीत मान, सन्मान, अपमान जे काही मला मिळाले ते कुटुंबानेही स्वीकारले. पण सत्तेत कारभार करताना जी गुप्तता पाळायला हवी होती, ती मी घरातही पाळली. घरात मी कधी काही गोष्टी शेअर केल्या नाहीत. अजमल कसाबला फाशी देण्याबाबतचा निर्णय मी घरातही कळू दिला नाही. सकाळी प्रणितीने मुंबईतून दिल्लीत फोन करून अाईला ही खबर दिली होती.

मुख्यमंत्रिपद हा महत्त्वाचा टप्पा
सर्वांनानेतृत्व देणारा नेता हे दाखवून देण्याची संधी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असताना मिळाली. एक दलित नेता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हेही समोर अाले. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हा अायुष्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे मी मानतो. मुख्यमंत्री म्हणून दलित, उच्चवर्णीय, शेतकरी अशा सर्वांना न्याय दिला. विद्यार्थी विमा योजना, शिष्यवृत्ती, अर्थसंकल्पात भटक्या, विमुक्तांना स्थान देता अाले. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकलो, असे शिंदे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...