आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा मातृभाव, बाळ पुन्हा आईच्या कुशीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सम्राट चौक परिसर. गुरुवार. सकाळचे वाजलेले. एक महिला आपल्या नवजात पोटच्या गोळ्याला रस्त्याकडेला सोडून जाताना नागरिकांनी पाहिले. पोलिसांना खबर गेली अन् फौजदार चावडीच्या कर्मचाऱ्यांचा मातृभाव जागा झाला. त्यामुळे त्या मातेचे हृदय द्रवले. मतपरिवर्तन घडले. आपली चिमुकली घेऊन ती माहेरी आईकडे परतली.
त्या मातेचे सासर संगमनेर. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. दारिद्र्य पाचवीलाच पूजलेले. आधीचे दोन मुले आणि दोन मुली. ती माता आजारी आणि अशक्त. बाळंत होऊन तीनच दिवस लोटलेले. गरिबीला कंटाळलेल्या त्या मातेने नाइलाजानेच आपल्या पोटचा गोळा सरळ रस्त्याकडेला ठेवला. मात्र पोलिसांनी आईच्या सुरात तिला समजावले. सगळेच दिवस सारखे नसतात. परिस्थिती निश्चित पालटेल. मुलगी जन्मली म्हणून काय झाले. ती उद्या भारताचे भविष्य बनेल, अशा आशावाद दाखवला.

आजारी मातेला पोटभर जेवू-खाऊ घातले. दुपारपर्यंत पोलिस ठाण्यात तिची कर्मकहाणी ऐकून घेण्यात आली. तिच्या आई, वडील, भावांना पोलिस ठाण्यात बोलावून समज दिली. संगमनेरला पतीशी मोबाइलवरून संपर्क साधला. त्याची उलट तपासणी घेतली. अखेर समज काढल्यानंतर ती माता वडिलांसोबत समाधानाने घरी पोहोचली.

सारेच अंतर्मुख होऊ
पोटच्यागोळ्याचा त्याग करण्याची वेळ एका मातेवर का आली, याचा आपण सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. आपल्या घरांमध्ये आरोग्यदायी, निकोप वातावरण राहावे, इतरांच्याही घरात आनंदी वातावरण असावे यासाठी आपण साऱ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. हा सामाजिक प्रश्न आहे.