आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिस्थितीला भिडल्या रणरागिणी, भाजीविक्रेत्यांचा अनुभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गरिबीमुळे शिक्षण घेता आले नाही. जगण्याची वाट बिकट असताना भाजीपाल्याने आधार दिला. व्यवसाय हलक्या दर्जाचा वाटत असला तरी त्यातूनच संसाराचा गाडा ढकलला. अनेक संकटे आली, पण हटल्या नाहीत या रणरागिणी.
स्वत: शिकल्या नाहीत. मात्र, भावंडे, मुले आणि नातवंडांना शिकविले. त्याचेच समाधान असल्याची भावना शहरात विविध ठिकाणी भाजीविक्री करणाऱ्या महिलांनी मांडली. नवरात्र उत्सवानिमित्त ‘दिव्य मराठी’ कार्यालयात आयोजित दिलखुलास गप्पा कार्यक्रमात मीना गायकवाड, छाया मोरे, साहेरा शेख यांनी संवाद साधला. भाजीविक्री करताना आलेले अनुभव आणि संघर्ष सांगितला.
‘दिव्य मराठी’ कार्यालयात संवाद साधताना डावीकडून मीना गायकवाड, छायाबाई मोरे, साहेरा शेख विठाबाई चाबुकस्वार.

शिक्षणाचे रोपटे घरात लावले
लहानपणीचवडीले गेले. सहा बहिणी आणि दोन भाऊ असा परिवार मागे ठेवून गेले. आईने हिंमत हारता भाजी विकून संसार रेटला. भाजी विकण्याची शिदोरी आईकडूनच मिळाली. घरातील हलाखीमुळे मी शिकले नाही. भाजी विकून तीन बहिणी आणि भावांना शिकवले. भाजी विक्रीच्या व्यवसायाने खूप आधार दिला. मला शिक्षण मिळाले नसले तरी भावंडे शिकली, मोठी झाली याचा अभिमान आहे. आज एक बहीण शिक्षिका आहे. एका बहिणीचे पती शिक्षक आहेत आणि त्यांची मुले डॉक्टर-इंजिनिअर आहेत. शिवाय एक भाची रशियात डॉक्टरेट करते आहे. भाजी विकत घरात शिक्षणाचे रोपट लावले. याचेच समाधान वाटते. छायामोरे

चार आणे- आठ आण्यांचा आधार
आईहिराबाई घरोघरी जाऊन भाजी विकत होती. खूप कष्टात तिने आम्हाला वाढविले. वयाच्या १५ व्या वर्षांपासून आईचे बोट धरून मीही भाजी विकू लागले. पहाटे वाजता मार्केट यार्डात जायचे. लिलाव घ्यायचा आणि मग पुढे मार्केटात बसून दिवसभर भाजी विकायची. एवढे कष्ट घेऊनही मुबलक पैसे मिळत नाही. आता तर महागाईने हाल होतात. पूर्वी चार आणे, आठ आणे गोळा करत संसार चालवला. २५ वर्षांपासून भाजी विकते. या व्यवसायातूनच मुलींची लग्नं केली, मुलांना दहावी -बारावीपर्यंत शिक्षण दिले. भाजी विकून फार पैसे मिळत नसले तरी या व्यवसायानेच जगण्याची ऊब दिली. जगण्याची दिशा दिली. आता नातवंडांना शिकताना पाहून अभिमान वाटतो. त्यांना खूप शिकवण्याचे स्वप्न आहे. मीना गायकवाड
-आताची भाजी फवारणी केलेली असते. त्यामुळे टिकत नाही. कधी संपते तर कधी िशल्लक राहिल्यास नुकसान सोसावे लागते.
-दुकानदार भाजीला अधिक दर लावतात, अन् लोक ते विकतही घेतात. पण पोत्यावर बसणाऱ्या भाजी विकणाऱ्यांकडे घासाघिस करतात.
-बहुतेक महिलांनी आईमुळेच घडलो, जगण्याला दिशा मिळाल्याचे सांगितले. मीना गायकवाड छाया मोरे यांना भावना आवरता आल्या नाहीत.

भाजी विकून मुलाला पोलिस केले
मीग्रामीण भागात वाढले. घरात एकत्र कुटुंबपद्धत, पती, तीन मुलांचा संसार सांभाळताना खेडोपाडी आठवडी बाजारात भाजीपाला विक्री केला. चाळीस किलो वजनाचा भार डोक्यावर घेऊन फिरले. पण, मुलाला पोलिस केलेच. बनशंकर नावाचा मोठा मुलगा पोलिस खात्यात आहे. मागील वर्षापासून जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसरात भाजी विकताना पती श्रीमंत, इतर दोन मुले संतोष अंबादास हे मला मदत करतात. इतर मुलांचे शिक्षण कमी असले तरी नातवंडांना मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले आहे. खेडोपाड्यात भाजी विकताना पदरात भाकरीची कोर बांधून पुढचा प्रवास सुरू होता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वाभिमान अन्् कष्टाच्या बळावर संसाराचा गाडा सुरळीत सुरू आहे. खूप कष्ट घेतले. आजही संघर्ष सुरू आहे. पण, मुलाला पोलिस केल्याचे समाधान आहे.
विठाबाई चाबुकस्वार

भाजीने दिला संसाराला हातभार
माझेसासर तांदूळवाडी. लग्नानंतर शहरात आले. पती खासगी कंपनीत काम करतात. त्यांच्या पगारावर घर चालवताना ओढाताण व्हायची. संसाराला हातभार लागावा म्हणून भाजी विकण्यास सुरुवात केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. त्यातून मुलांना शिकवले. एक मुलगी बीए झाली तर दुसरी मुलगी बारावी शिकली. मुलगा आता बारावीत आहे. भाजीपाला विक्रीतूनच हे शक्य झाले. लोकांच्या दैनंदिन गरजा भागवताना घराला हातभार देण्याचे काम या व्यवसायाने मला शिकविले. या व्यवसायाने मला जगण्याचा मार्ग दिला.