सोलापूर- "महिलांनी विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. परंतु प्रत्यक्षात महिलांना स्त्री पुरुष अशी समान वागणूक दिली जात नाही. त्यासाठी महिलांनी स्वत: सबल बनले पाहिजे. स्वत:बरोबर आपल्या मुलींनाही सबल बनवले पाहिजे,' असे प्रतिपादन कर्नाटक राज्य महिला विश्वविद्यालयाच्या कुलगुरू प्रा. डॉ. मीना चंदवारकर यांनी केले.
भारती विद्यापीठ राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मानव अधिकार या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. मीना चंदवारकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. मुकुंद सारडा होते.
डॉ. चंदवारकर म्हणाल्या, "स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. स्त्री भ्रूणहत्येसाठी स्त्रियाही जबाबदार आहेत. त्यासाठी स्त्रियांनाही जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागणार आहे. महिलांनी शिक्षण घ्यावे, यासाठी विविध योजना आहेत. परंतु शिक्षणातही महिलांचे प्रमाण कमी आहे.'
डॉ. मुकुंद सारडा म्हणाले, "मानवी हक्क हा कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. परंतु कायदा हा कागदावरच असून, त्याचा प्रत्यक्षात कोणीच वापर करत नाही. कायद्याविषयी जागृती करण्याची गरज आहे.' सचिन सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. ईफत खान, प्रियांका रावुरी यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता गंभीरे यांनी अाभार मानले.
सोलापुरात प्रथमच मानव अधिकार या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी शहर जिल्ह्यातील ४०० विद्यार्थिनी महिलांनी सहभाग नोंदवला.
महिलांचे प्रश्न
हीकार्यशाळा पाच सत्रांमध्ये होती. पहिल्या सत्रात अॅड. रमेश कणबसकर यांनी "महिला तस्करी हिंसा,' अॅड. मंगला जोशी यांनी "विविध प्रवर्गातील महिलांच्या समस्या' या विषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात अॅड. प्रियांका लिगाडे यांनी "कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार,' तर स्वप्ना वळसंगे यांनी "घरगुती हिंसाचार महिला बचाव' यावर आपले विचार मांडले. शेवटच्या सत्रात प्रा. काझी यांनी "महिला रोजगारासंबंधीचे प्रश्न' यावर मत प्रकट केले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डाॅ. मीना चंदवारकर, प्रा. डॉ. मुकुंद सारडा, डॉ. व्ही. एस. मंगनाळे, डॉ. नदाफ, प्रा. कोठारी, प्रा. सूर्यवंशी आदी. कार्यशाळेसाठी उपस्थित महिला विद्यार्थिनी.