आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कामगारांनी फोडला टाहो, विडी उद्योग वाचवा..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - धूम्रपान विरोधी कायद्यातून विडी उद्योग वगळण्याच्या मागणीसाठी कामगारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाहो फोडला. प्रचंड निदर्शने करत घोषणाबाजी केली. विडी कारखानदारांनी सोमवारपासून १० दिवसांचा बंद जाहीर केला. त्यामुळे महिला कामगार प्रचंड संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या. ‘विडी उद्योग संपला तर आम्ही जगायचं कसं?’ असा प्रश्न त्यांनी शासनाला विचारला.
धूम्रपानविरोधी कायद्यातील सुधारित वेष्टण नियमाची अंमलबजावणी एप्रिल २०१६ पासून होत आहे. विड्यांच्या एकूण वेष्टणाच्या ८५ टक्के भागात सचित्र धोक्याचा इशारा देण्याचे अनिवार्य केले आहे. त्याला विरोध दर्शवून विडी उत्पादकांनी सोमवारपासून २५ फेब्रुवारीपर्यंत ‘कारखाने बंद’ ठेवण्याचे जाहीर केले. या दहा दिवसांत कामगार संघटना महासंघाने आंदोलन सुरू केले. पहिल्याच दिवशी झालेल्या निदर्शनांसाठी सुमारे १० हजार महिला कामगार रस्त्यावर उतरल्या होत्या.

महासंघाचे निमंत्रक विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पद्मा म्हंता, अॅड. सुनील पवार, राहुल गुजर, सायबण्णा तेग्गेळी, श्रीहरी साका, श्रीमती चंद्रकला गुजर, श्रीनिवास चिलवेरी, विठ्ठल कुऱ्हाडकर, पार्वती पंदिला, पुरुषोत्तम सामल, श्रीशैल वाघमोडे आदी उपस्थित होते.

‘सीटू’ स्वतंत्र लढणार
विडी उत्पादकांचा बंद आणि महासंघाच्या आंदोलनात लालबावटाप्रणीत ‘सीटू’चा सहभाग नाही. याबाबत विचारले असता, सीटूचे प्रदेशाध्यक्ष नरसय्या आडम म्हणाले, “धूम्रपानविरोधी कायदा केंद्राचा आहे. त्याच्या विरोधात सीटूने २००४ पासून आवाज उठवला. आताही पंतप्रधानांपर्यंत जाण्याची तयारी केली. परंतु या आंदोलनात कामगारांना वेठीस धरू नये, अशी सीटूची भूमिका आहे. कारखाने बंद ठेवल्याने कामगारांची रोजी-रोटी बुडते. त्याची भरपाई कारखानदार देत नाहीत. या कायद्याच्या विरोधात कामगारच रस्त्यावर उतरले. आताही त्यांनाच रस्त्यावर आणून त्यांची मजुरी बुडवली जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. केंद्राला जाब विचारण्यासाठी स्वतंत्र लढाही उभारणार आहे. बुधवारी सीटू प्रचंड मोर्चा काढून केंद्राला जाब विचारेल, एकीकडे ‘मेक इन इंडिया’ म्हणता. दुसरीकडे कामगारांच्या रोजीरोटीवर घाला घालता?”

धूम्रपान विरोधी कायद्यातून विडी उद्योग वगळण्याच्या मागणीसाठी कामगार संघटनांच्या महासंघाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. हजारो कामगार सहभागी झाले होते.