आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तासांमध्ये उलगडला सारीपाट, अपक्ष असतील नगण्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी आयुक्त विजयकुमार काळम - पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रिया दोन तासांत पार पडली. १०२ पैकी १५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, २८ ओबीसी आरक्षित असून ५७ जागा खुल्या आहेत. १०२ पैकी ५० टक्के जागा महिलासाठी राखीव आहेत. २६ प्रभाग आहेत. त्यापैकी २४ प्रभागांत प्रत्येकी चार तर २५ आणि २६ क्रमांकाच्या प्रभागात प्रत्येकी सदस्य असतील. प्रभाग क्रमांक २४ आणि २६ वगळता अन्य प्रभागांमध्येच एक जागा खुली असणार आहे. त्यामुळे दिग्गज इच्छुकांना निवडणूक लढवता येणार आहे. आरक्षित जागांवर निवडणुका लढवता येत नसलेल्यांना खुल्या गटातून निवडणूक लढवता येणार आहे.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून नागरिक हुतात्मा स्मृती मंदिरात येत होते. पहिली रांग मनपा पदाधिकारी, मागील पाच रांगा नगरसेवकांसाठी राखीव असताना तेथे कोणीही येऊन बसत होते. त्यामुळे स्थायी समिती सभापतींना मागे बसावे लागले. महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष भारत जाधव, भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाणसह प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते. महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, सहाय्यक नगर रचना अधिकारी महेश क्षीरसागर, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी प्रक्रिया विनाव्यत्यय पार पाडली.
महापालिका निवडणुकसाठी २६ प्रभागांतील आरक्षण रचना शुक्रवारी जाहीर झाली. त्यानंतर विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी आपापले प्रभाग निश्चित केले. अनेक नगरसेवकांच्या प्रभागांचे तीन तुकडे झाले तरी मूळ ठिकाण जोडून इतर भागात उभे राहता येणार आहे. एकंदर परिस्थिती पाहता महापालिका निवडणुकीत गावठाण भागात तिरंगी लढत होती. हद्दवाढ भागात खुल्या जागांवर तिरंगी तर आरक्षित जागांवर दुरंगी लढती होतील. आघाडी आणि युती झाल्यास बहुतेक लढती दुरंगीच होतील. संजय हेमगड्डी, मधुकर आठवले, आनंद चंदनशिवे या नेत्यांना ओपनचा आधार घ्यावा लागेल.

शहर उत्तर मतदार संघात भाजपचे स्थान पक्के आहे. प्रभाग क्रमांक सातमध्ये मनोहर सपाटे, पद्माकर काळे, श्रीकांत घाडगे, मनोज गादेकरसह अन्य राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर भाजपला दोन हात करावे लागणार आहे. प्रभाग सातमध्ये अंजली चौगुले आणि देवेंद्र काेठेही रिंगणात असू शकतील. प्रभाग क्रमांक तीन भाजपस अनकूल आहे. तरी इच्छुक महिलांची संख्या जास्त आहेत. याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न काँग्रेस करू शकतो. विडी घरकुल परिसरात महेश कोठे यांचे वर्चस्व आहे. तेथे शिवसेना जास्त जागांचा आग्रह युती करताना धरेल. बसपचे नगरसेवक चंदनशिवे यांचा प्रभाग तीन प्रभागात विभागला गेल्यामुळे तीनपैकी एका प्रभागाची निवड त्यांना करावी लागणार आहे.

उत्तर कसबा, माणिक चौक परिसरात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तेथे इच्छुकांची संख्या जास्त असेल. प्रकाश वाले, आनंद मुस्तारे, बिपीन धुम्मा, जगदीश पाटील यांच्यासह अनेक जण इच्छुक असतील. माजी महापौर आरिफ शेख, अॅड. यु. एन. बेरिया, अलका राठोड, मनोहर सपाटे, पुरणचंद्र पुजाल यांचे प्रभाग सुरक्षित आहे. विजापूर वेस परिसरात ख्वाजादाऊद नालबंद, मकबूल मोहोळकर, रफीक हत्तुरे हे इच्छुक असतील. त्यामुळे तेथे लक्षवेधी लढती होतील. स्थायी समितीचे सभापती रियाज हुंडेकरी यांचा प्रभाग विभागला गेला आहे.

असे असेल चित्र
शहर उत्तरमध्ये भाजप, शहर मध्य काँग्रेस, दक्षिणमध्ये संमिश्र मतदान होईल. उमेदवारी नाकारल्यास दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढेल. नई जिंदगी, शास्त्री नगर भाग एमआयएमला अनुकूल.

क्राॅस व्होटिंगची आहे अधिक शक्यता
प्रभाग पद्धतीत अपक्ष उमेदवारांची संख्या अत्यल्प असेल. एकाच समाजाचे उमेदवार विविध पक्षांत विखुरले गेल्याने क्राॅस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. जुळे सोलापूर भागात मोहिनी पत्की भाजपकडून तर नागेश ताकमोगे काँग्रेसकडून आले होते. साधारणपणे ६० टक्के मतदान झाल्यास त्यातील २० ते ३० टक्के उमेदवार पाहून, १५ टक्के पक्ष पाहून, १० टक्के समाज पाहून तर १० टक्के ऐनवेळच्या परिस्थितीनुसार होते, असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे.

यांची झाली गोची
संजय हेमगड्डी, मधुकर आठवले, बाबा मिस्त्री, आनंद चंदनशिवे, दीपक राजगे आदी राखीव जागांवर लढणाऱ्या नेत्यांच्या हक्काच्या प्रभागात महिलांसाठी आरक्षण पडल्याने त्यांना खुल्या गटातून नशीब आजमावावे लागणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आरक्षण सोडत प्रक्रिया झाली. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या. दुसऱ्या छायाचित्रात सोडत प्रक्रिया पार पाडताना आयुक्त विजयकुमार काळम - पाटील, उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, सहाय्यक नगर रचना अधिकारी महेश क्षीरसागर, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी आदी.
बातम्या आणखी आहेत...