पंढरपूर - ‘आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या महापूजेतून मिळालेली शक्ती व ऊर्जेचा वापर राज्यातील सामान्य माणसांच्या कल्याणासाठी करणार अाहोत’, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे व्यक्त केली. या बरोबरच राज्यात सर्वदूर दमदार पाऊस पडू दे, राज्यातील शेतकरी समाधानी होऊ दे, अशीही प्रार्थना करतानाच ‘
आपली प्रार्थना विठ्ठल नक्की ऐकणार,’ असा असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा सोमवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. त्या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यंदा मुख्यमंत्र्यांसमवेत वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान हिंगाेली जिल्ह्यातील पिंपरी खुर्द (ता. कळमनुरी) येथील राघोजी नारायणराव धांडे व व त्यांच्या पत्नी संगीता यांना मिळाला. गेल्या सोळा वर्षांपासून ते पायी वारी करत आहेत. महापूजेनंतर मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या हस्ते मुख्यमंत्री, महसूलमंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आदींचा सत्कार करण्यात अाला.
या वेळी अमृता फडणवीस, एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या पत्नीचाही सत्कार करण्यात आला. वारकरी प्रतिनिधी राघोजी नारायणराव धांडे यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी, तर संगीता धांडे यांचा सत्कार अमृता फडणवीस यांनी केला. धांडे दांपत्यास या वेळी मोफत एस. टी. प्रवासाचा पास देण्यात देण्यात आला.
‘शेतकरी सुखी झाला तर राज्य सुखी होईल. आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला, हा आपल्या जीवनातील भाग्याचा दिवस आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी शासनाने आराखडा तयार केला आहे. तो ठराविक मुदतीत पूर्ण करण्यासाठी विशिष्ट कालावधी निश्चित केला जाणार आहे. राज्यात गेल्या दोन, तीन वर्षांपासून पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे सध्या अवर्षणाची स्थिती निर्माण होण्याची भीती आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
परदेश वारीचेही धांडे मानकरी
श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित राहून पूजेचा मान मिळालेले हिंगाेली जिल्ह्यातील वारकरी राघोजी नारायणराव धांडे यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. सलग तीन वर्षे कंपनीने दिलेले विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे आपणाला तीन वेळा परदेश वारी करण्याची संधी मिळाली. याबरोबरच गेल्या सोळा वर्षांपासून आषाढी यात्रेसाठी ते येथे येत आहेत. त्यामुळे ‘श्री विठ्ठलाने प्रसाद म्हणून यंदा महापूजेची आज संधी दिली,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.