आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दीमुळे रिक्षा थांबली, मुलाचाच अपघात झाला होता; आई म्हणत मुलाने वडिलांच्या मांडीवर प्राण सोडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पंधरा मिनिटांपू्र्वी अाई-वडिलांना सांगून मुलगा काॅलेजसाठी घराबाहेर पडला. त्याच मुलाचा अपघात पाहून वडिलांच्या हृदयाचे ठोके काही काळ चुकले. मुलाला मांडीवर घेऊन धीर देत असतानाच अाई....अाई... म्हणून त्याने वडिलांच्या मांडीवरच प्राण सोडले. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास अक्कलकोट रस्ता नाक्याजवळ मधुबन हॉटेलजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. अपघातस्थळी मुलाची सायकल बाजूला पडलेली.. ट्रक उलटून रस्त्यावर पडलेला...अशा भयाण स्थितीत वडिलांनी बळ एकवटून ट्रकच्या केबिनखाली अडकलेल्या मुलाला बाहेर काढले. कुंभारीच्या खासगी रुग्णालयात नेले. डाॅक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगताच वडिलांच्या अंगातले उरले-सुरले अवसान गेले. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर दाटला होता. विडी घरकुलमधील श्रीराम परिवारावर हा प्रसंग ओढवला. मनोज चंद्रशेखर श्रीराम (वय २१, रा. माँसाहेब विडी घरकुल, कुंभारी, सोलापूर) असे मृत मुलाचे नाव अाहे. याच अपघातात ट्रक क्लिनर भगवान चंद्राम कोळी (वय २२, रा. सावळेश्वर, अाळंद, गुलबर्गा) मृत्युमुखी पडला.
शुक्रवारी सकाळी एक ट्रक (एमएच १२ केपी १२४१) सोलापूरहून अक्कलकोटमार्गे कर्नाटकात जात होता. त्यात लोखंडी पट्टे होते. अक्कलकोट नाक्याहून पुढे अाल्यानंतर मधुबन हाॅटेलजवळ अोहरटेकच्या प्रयत्नात असतानाच ट्रकमधील लोखंडी पट्ट्याला बांधलेली साखळी सुटली. यानंतर पट्टी उलटल्यामुळे चालकाचा ताबा सुटला. ट्रक उजव्या बाजूला येऊन सायकलवर जाणाऱ्या मनोजवर उलटला. सुमारे पंधरा ते वीस फुटांपर्यंत ट्रक फरटफटत गेला. क्लिनर चाकाखाली सापडला तर मनोज केबीनच्या बाजूला सापडला. अपघातात दोघेही मृत्यू पावले. वळसंग पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात अाणला. शवविच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

मनोजहुशार अन् जिद्दी
मनोजला सीए व्हायचे होते वा बँकेत नोकरी करायची होती. तो एनसीसीमध्येही सहभागी होता. पोलिसांच्या काॅलेज-छात्र मित्र योजनेत सहभागी होता. गेल्या मंगळवारीच तो पोलिस मुख्यालय मैदानावर परेडसाठी गेला होता. सिध्देश्वर यात्रा, गणपती उत्सव काळात पोलिसांसोबत बंदोबस्त दिला होता. अपघाताचे वृत्त समजताच कारखानदार, काॅलेजधमील मित्र, नातेवाइक शासकीय रुग्णालयात अाले होते.

माझे हृदय काही काळ थांबले होते...
माझा मुलगा मनोज खूप कष्टाळू जिद्दी होता. नोकरी लागल्यावर तुम्हाला सुखात ठेवेन बाबा असे नेहमी म्हणायचा. दयानंद महाविद्यालयात बी. काॅम.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. अाई बहिणीवर त्याचा फार जीव. तो अाम्हा सर्वांचीच खूप काळजी करायचा. सकाळी चहा, नाश्ता घेऊन काॅलेजला जाण्यासाठी सायकलवर घराबाहेर पडला. मी एमअायडीसी भागातील बोमड्याल यांच्या मयूरी टाॅवेल कारखान्यात कामाला जाण्यासाठी टमटमधून निघालो. पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर वाहतूक जॅम झाली होती. ट्रक उलटला होता. अपघात पाहण्यासाठी मीही खाली उतरलो. पाहतो तर जवळच मोबाइल पडलेला. तो अोळखीचा वाटला. मुलासोबत अाणखी एक मुलगा होता तोही बाजूला थांबला होता. शंका अाली. जवळ जाऊन पाहतोय तर काय मुलगाच ट्रकच्या केबीनखाली अडकला होता. अाई..अाई म्हणून अोरडत होता. त्याला धीर देत नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. पण, मुलगा गेला हो... असे सांगताना चंद्रशेखर धायमोकलून रडू लागले. घरची गरिबी, पत्नी पद्मा विडी कामगार, एक मुलगा पवन दहावीत तर मुलगी शिवानी अाठवीत. संसाराचा गाडा हाकत असताना अामच्यावर हा दुर्दैवी प्रसंग अाला असे अश्रूभरल्या डोळ्यांनी त्यांनी सांगितले.

वळसंगच्या स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीजवळ ११ मे २०१५ रोजी अशाच पद्धतीचा अपघात झाला होता. त्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. कुंभारीतील गोदूताई परुळेकर नगरातील सैफन बंदेली शेख (वय ३२) आणि सादिक बंदेली शेख (वय २२) हे बंधू अक्कलकोटला एक दस्त करण्यासाठी मोटारसायकलवर निघाले होते. त्यांचे आई-वडील एसटीने त्यांच्या मागूनच येत होते. मोटारसायकलला टँकरने ठोकरल्यानंतर दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर गर्दी जमल्याने आई-वडील येत असलेली एसटी तिथे थांबली. खिडकीतून घटना पाहिल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला.