आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमींच्या मदतीसाठी धावली शहरातील माणुसकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- झाडेचहूकडे पण छाया कुठेच नाही, गर्दीत माणसांच्या ‘माया’कुठेच नाही... अशी आजची परिस्थिती आणि त्यासंबंधीचा दाहक अनुभव अनेकांच्या पाठीशी असताना शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या बस अपघातातील जखमी विद्यार्थ्यांच्या मदतीच्या वेळेस मात्र अमरावतीकरांनी हिरिरीने पुढाकार घेऊन माणुसकीचे जणू दर्शन घडवले.

यामध्ये विविध पक्षांचे राजकारणी, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह इर्विनमध्ये पोहोचलेल्या प्रत्येकानेच जखमींची आस्थेने विचारपूस करून त्यांना पिण्याचे पाणी, फराळाचे पदार्थ केळी स्वत:च्या पैशांनी आणून दिली. संकटसमयी सर्वांनी केलेली ही सकारात्मक मदत अनेकांसाठी लाखमोलाची ठरली.

अनेकदा राजकीय व्यक्ती किंवा दानशूर व्यक्ती अनाथालय, बालकाश्रम किंवा वृद्धाश्रमात जाऊन मिठाई, कपडे, बिस्किटांचे वाटप करतात. परंतु,शनिवारी बस अपघात ात जखमी झालेल्या ३८ प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. सर्व जखमी एकाचवेळी रुग्णालयात दाखल झाल्याने रुग्णालयात एकाच धावपळ झाली.या वेळी विविध राजकीय पक्षांच्या व्यक्तींनी रुग्णालयात पोहोचून जखमींना पाणी, केळी बिस्किटे दिलीत तसेच त्यांना आधारही दिला. राजकीय पक्ष कुठेही राजकारण करतात, हा एक शिक्का राजकारण्यांवर असतो. तो काहीअंशी खरा असला, तरी प्रत्येकवेळी
राजकारण हाच एकमेव उद्देश नसतो, हे शनिवारी इर्विन रुग्णालयातील राजकीय व्यक्तींच्या कर्तव्यावरून दिसून आले. शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एसटी बस झाडाला धडकली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या ३८ पेक्षा जास्त होती. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक होती. कारण महाविद्यालयातून घरी जाण्याची ती वेळ होती. सकाळपासून महाविद्यालयात आलेले विद्यार्थी घराकडे निघाले होते, यातच अपघात झाला त्यांना दुखापत झाली. यातही अनेक मुलामुलींना नवरात्रीचे उपवास होते. त्यामुळे पोटात काहीच नव्हते. यात अपघाताचा धक्का त्यामुळे अनेकांना चक्रावल्यासारखे होत होते. रुग्णालयात आल्यानंतर पाणी पाणी करणाऱ्या जखमींना पाणी देण्यापेक्षा उपचार करणे आवश्यक होते. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा उपचारात व्यस्त झालेली होती. याच वेळी विविध राजकीय पक्षांच्या व्यक्तींनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमींची अवस्था लक्षात घेता तातडीने पाण्याचे पाउच बिस्किटे, चहा आणला. मात्र, अनेकांना उपवास होता. त्यामुळे तातडीने केळी मागवण्यात आली. यासोबतच प्रत्येक जखमी मुलामुलींजवळ जाऊन त्यांना मानसिक आधारसुद्धा दिला. अपघातात मार किती लागला यापेक्षा तो धक्काच भीतीदायक होता. अशावेळी राजकीय व्यक्ती, वैद्यकीय यंत्रणा यांनी जखमींना नातेवाईक किंवा कुटुंबीयांची कमतरता जाणवू दिली नाही. प्रत्येकानेच जखमींप्रती आपलेपणाची भावना दाखवून दिली.

महामंडळाची बस शनिवारी झाडाला धडकल्याने जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने इर्विनमध्ये भरती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.

रुग्णवाहिका चालकांचेही सहकार्य
अपघातातील अनेक जखमींच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांचे सिटी स्कॅन करणे गरजेचे होते. इर्विनमधील सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक नव्हते. या वेळी खासगी रुग्णवाहिकांची मदत घेण्यात आली. रुग्णवाहिकाचालकांनी मोठ्या मनाने पुढे येऊन रुग्णांना सहकार्य केले.