आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या ‘हुतात्मा’तून पडून तरुणाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - धावत्या रेल्वेमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. सोलापूर पुणे एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी सकाळी अनगर ते वाकाव दरम्यान ही घटना घडली. गाडीतील प्रवासी आणि रेल्वे चालकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. कुर्डुवाडीत उपचाराला नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
अक्षय चतुर्भूज बारबोले (वय २१, रा. कल्याण नगर, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुर्डुवाडी येथील शासकीय औद्योगिक संस्थेत(आयटीआयत) प्रवेश घेण्यासाठी तो हुतात्मा एक्स्प्रेसने कुर्डुवाडीला चालला होता. अनगर ते वाकाव दरम्यान तोल जाऊन तो खाली पडला. काही प्रवाशांनी त्याला खाली पडताना पाहिले.
त्यानंतरलगेच काही जणांनी डब्यातील चैन ओढून गाडी थांबविली. घटनेची माहिती रेल्वे चालकांला दिली. त्यांनी ताबडतोब वाकाव रेल्वे स्थानकाच्या रेल्वे स्थानक व्यवस्थापक गाडीतील गार्डशी संपर्क साधला.दरम्यान अक्षयला शोधण्यासाठी गाडी उलट्या दिशेने मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन किमी गाडी मागे घेत गार्ड अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने शोध घेण्यात आला. तीस ते चाळीस मिनिट शोध घेऊनही अक्षय सापडला नाही. गाडीस बराच विलंब होऊ लागल्याने हुतात्मा पुढे सोडण्याचा निर्णय झाला.

अनगर ते वाकाव दरम्यान मुलगा पडल्याची माहिती इतर रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आली. दरम्यान एका गँगमनला अक्षय जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या खिशातील ओळखपत्रावरुन त्याला ओळखले. दुर्दैवाने अक्षयच्या गावाजवळच हा अपघात झाला होता. हुतात्माच्या पाठीमागे येणाऱ्या कोईम्बतूऱ- कुर्ला एक्स्प्रेसने जखमी अवस्थेतील अक्षयला उपचारासाठी कुर्डुवाडी येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हुतात्मा एक्स्प्रेसला तासाचा उशीर झाला. शिवाय इतर प्रवासी गाड्या मालगाड्यांवरही परिणाम झाला. घटनेची नांेद कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्यात झाली आहे.

तोल जाऊन पडला
सोलापूर हून हुतात्मा एक्स्प्रेस निघाल्यानंतर अक्षय डब्यातील दरवाज्याजवळ थांबला होता. अनगर ते वाकाव दरम्यान तो रेल्वेतून पडला. त्याला शोधण्यासाठी हुतात्मा एक्स्प्रेस तीन किमी उलट्या दिशेने धावली. प्रयत्न करुनही त्याला वाचवता आले नाही. हुतात्मा एक्स्प्रेसमधील प्रवासी परिमल धवळीकर यांनी सांगितलेला हा वृत्तांत.

आईचा हंबरडा
अक्षयला मोटारसायकल रायडिंग कसरतीची आवड होती. एसईएस पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. समाजकार्याची आवड असल्याने अनेक कार्यक्रमात त्याचा सहभाग असायचा. कल्याणनगर येथे तो लोकप्रिय होता. अक्षयचे वडील शिवशाहीमध्ये कामाला आहेत. अक्षयला दोन बहिणी आहेत. एकलत्या एक मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच आईने हंंबरडा फोडला. मंगळवारी दुपारी सीना दारफळ (ता. माढा )येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...