आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या हाती आला पतीचा तुटलेला हात, सोलापूर रेल्‍वेस्‍थानकावरील थरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे डब्याच्या दारात उभे राहुन तो तरुण पत्नीशी बोलत होता...अचानक मागचा प्रवासी मागुन आला आणि त्याचा जोरदार धक्का तरुणाला बसला...तो खाली कोसळला...पण पाठीवरील बॅग डब्याच्या पायऱ्यांना अडकली. अन् तो डब्याबरोबर फरफटत निघाला... पाय डब्याखाली जातील म्हणुन काळजी घेतानाच डावा हात मात्र रुळांवर पडला...पाहता पाहता त्यावरुन धडाधड सात डबे गेले... मनगटापासुन तुटलेल्या हाताचा चेंदामेंदा झाला...तितक्यात पत्नी आल्यानंतर त्यांच्या हाती पोलिसांनी तो हात एका प्लॅस्टीक पिशवीतुन दिला.
 
हा थरार सोलापूर रेल्वे स्थानकाच्या फलाट दोन वर घडला. तुटलेला हात घेवून त्याला रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने तो वाचला. अतिरक्त स्त्रावाने तो तरुण दगावला देखील असता. डब्याच्या दारात उभे राहुन बोलणे किती महागात पडते ते या प्रकारावरुन लक्षात येते.   

काही दिवसांपुर्वी सोलापूर स्थानकावर हुतात्मा एक्सप्रेस येत असताना हा प्रकार घडला. हुतात्माच्या डी ४ हया क्रमाकांच्या डब्याच्या दारात उभे राहुन रेवणसिध्द बागलकोटे  (वय ३२, रा. पोलिस वसाहत, सोलापूर मुख्यालयजवळ , सोलापूर ) बोलत होते. याच वेळी पाठीमागच्या प्रवाशाचा धक्का लागल्याने बागलकोटे हे डब्यातुन खाली कोसळले. रेवणसिध्द यांनी प्रसंगावधान राखुन जीव वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला. एव्हाना हा प्रकार अन्य प्रवाशांच्या लक्षात आला. त्यांनी रेवणसिध्दना वाचविण्यासाठी डब्यातील चैन ओढली. रेल्वेचा वेग जरी कमी झाला असला तरी त्या दरम्यान सात डबे हातावरुन गेले होते.

गाडी थांबल्यानंतर प्रवाशांनी रक्ताच्या थारोळयात रेवणसिध्दांना पाहिले. ताबडतोब याची माहिती रेल्वे प्रशासनाला व रेल्वे पोलिसांना मिळाली. काही मिनीटातच रेल्वेचे डॉक्टर घटनास्थळी पोहचले. प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र घटना गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. या दरम्यान रेल्वे पोलिसांनी तुटलेल्या हाताचा शोध सुरु केला. काही वेळाच्या शोधानंतर त्यांना तो मनगटापासुन तुटलेला हात मिळाला. तो हात पोलिसांनी प्लॅस्टीकच्या पिशवीत घालुन रेवणसिध्दांची पत्नी स्नेहा यांच्या हाती सोपविला. यावेळी त्यांच्या पत्नीला पिशवीत काय आहे हयाची सुतराम देखील कल्पना नव्हती.   
 
खासगी रुग्णालयात उपचार सुरु  
जखमी रेवणसिध्द बागलकोटे यांना सुरुवातीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हॉस्पिटल प्रशासनाकडुन अपेक्षित असा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतीच त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तो हात जोडता आला नाही. बुधवारी पेलवीसची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.  

कुटुंबाला मदतीची अपेक्षा
आत्तापर्यत उपचारासाठी सुमारे ३ लाख रुपयांचा खर्च आला. पेलवीस शस्त्रक्रियेनंतर यात आणखी भर पडेल. रेल्वेकडुन आर्थिक मदत व पतीला रोबोटीक हात मिळावे अशी  विनंती पत्नी स्नेहा बागलकोटे यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...