आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंबेडकर जयंतीसाठी तरुणांनी स्वकष्टाने जमविले 2 लाख रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कोणताही सार्वजनिक उत्सव म्हटला की, वर्गणी अाणि त्यातून होणारे वाद हे अाता नित्याचेच झाले अाहे. मात्र याला फाटा देत वर्गणी मागता काही महिने मेहनत करून त्यातून मिळणाऱ्या मेहनतानामधील काही रक्कम एकत्र करून, त्यातून अांबेडकर जयंतीचा उत्सव साजरा करण्याचा चांगला निर्णय कुंभार वेस, धाकटा राजवाडा येथील तरुणांनी घेतला अाहे. नोव्हेंबर महिन्यापासून हे कार्यकर्ते अापल्या कमाईतून दरमहा रक्कम एकत्र करीत अाहेत. अातापर्यंत दोन लाख रुपये जमा केले आहेत.

कुंभार वेस, धाकटा राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संघटना गेल्या चार वर्षांपासून आंबेडकर जयंती साजरी करते. मिरवणूक काढून जल्लोषही केला जातो. याकरिता लाखोंचा खर्च होत होता. खर्च वर्गणीतून उचलला जात होता. शहरात काही ठिकाणी वर्गणीच्या कारणावरून अनेक वाद झाले, वर्गणी मागण्यावरून असे प्रसंग उद्भवले. ते टाळण्यासाठी एक चांगली सुरुवात म्हणून या संघटनेच्या तरुणांनी वर्गणीचे पैसे उचलता आपल्या कष्टाच्या पैशांनी डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला.
नोव्हेंबर २०१५ पासून या तरुणांनी आपल्या पगारीतील पैसा गोळा करण्याचे काम सुरू केले. धाकटा राजवाडा परिसरात दोरी बनवण्याचा व्यवसाय आहे. दोरी बनवण्याच्या एका चरख्यावर बारा लोक काम करतात. या परिसरात असे तीन चरखा आहेत. एका चरख्यावर दिवसभरात पाच हजार रुपयांचे काम होते. आठवड्यातील शनिवार आणि रविवार या दोन दिवसांचा सर्व पगार हे तरुण जमा करत होते. तसेच धाकटा राजवाडा येथील २७ तरुण मंगळवार बाजारात मासे विक्रीचा व्यवसाय करतात. दर मंगळवार, बुधवार मासे विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी त्यादिवशीचा पूर्ण पगार या तरुणांनी जयंतीसाठी जमा करून ठेवला.

यंदा करणार संविधानाचा देखावा
हाप्रयत्न नोव्हेंबर २०१५ पासून सुरू झाला तो आजतागायत सुरू आहे. जयंतीपर्यंत हा प्रयत्न सुरू राहणार आहे. आपल्या कष्टाच्या पैशातून डॉ. बाबासाहेब यांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात येणार अाहे, असे मत या तरुणांनी व्यक्त केले. यंदाच्या १२५ व्या जयंतीची मिरवणूक मोठ्या थाटात काढण्यात येणार असून यामध्ये भारतीय संविधानाचा देखावा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला आयुष्य दिले, जगण्याचा मार्ग दाखविला. भारत देशाला लोकशाहीचा मार्ग दाखविला. ते आमचे दैवत आहेत. अशा महापुरुषाची जयंती श्रमातून करायला खूप आनंद होतो. म्हणून नोव्हेंबर महिन्यापासून आम्ही आमच्या पगारीतला काही पैसा जमा करून ठेवायला सुरुवात केली. याच पैशातून यंदाची जयंती साजरी होणार. सर्व समाजातील बांधवांनी आपापले उत्सव श्रमातूनच करावेत. आनंद गायकवाड, अध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...