आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांसाठी तालुक्यात मदत केंद्राची व्यवस्था करा; जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी समन्वय समितीची बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -  जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुका निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात होण्यासाठी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रत्येक निवडणूक कार्यालयात मदत केंद्र निर्माण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी दिले. त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी तालुकानिहाय विविध उपक्रम घेण्याच्या सूचना केल्या. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात ही बैठक झाली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, समन्वय अधिकारी रेश्मा माळी उपस्थित होते. 

निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीसाठी एकात्मिक आराखडा तयार करावा. संभाव्य मतदान केंदे, बंदोबस्त आराखडा, मतदान केंद्रातील पायाभूत सुविधा, मतामोजणी केंद्र यांची प्राथमिक तयारी करून ठेवावी. उमेदवारांना प्रचारसभेसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर परवानगी दिली जावी. शासकीय विश्रामगृह निवासासाठी उपलब्ध करून देता येईल. पण त्यासाठी सर्वांना समान संधी उपलब्ध होईल, याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 
 
श्री. रेळेकर यांनी नागरिकांकडून शस्त्रे जमा करून घेण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले. तर माळी यांनी प्रथम निवडणुकीच्या बाबत सादरीकरण केले. बैठकीस उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, श्रीमंत पाटोळे, विजय देशमुख, संजीव जाधव, श्रावण क्षिरसागर, संजय तेली, वर्षाराणी भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, कार्यकारी अभियंता विकास मोरे आदी उपस्थित होते. 

मतदानाची टक्केवारी वाढवा 
जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढणे अपेक्षित आहे. त्यासाठी जनजागृती करावी, सर्व सार्वजनिक ठिकाणी मतदान करण्याबाबतचे फ्लेक्स लावा. २६ जानेवारी रोजीच्या ग्रामसभेतही मतदानाची टक्केवारी वाढण्याबाबत आवाहन केले जावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

सोशल मीडियावरील प्रचारावरही ‘नजर’ 
निवडणूकनिर्णय अधिकाऱ्यांनी भरारी पथक, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम, बंदोबस्त पथक, परवानगी देण्यासाठी समिती स्थापन करणेे, इलेक्टॉनिक माध्यमाद्वारे प्रचार करण्यापूर्वी संबंधित साहित्याला मंजुरी देण्यासाठी, सोशल मीडियाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी समिती नियुक्त करणे, सोशल मीडीयाचा गैरवापर होणार नाही याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

खर्चाच्या तपशिलाबाबत कार्यवाही करा 
निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत खर्चाचे तपशील सादर करणे आवश्यक असते. उमेदवार तथा सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीत याबाबत माहिती दिली जावी. खर्चासाठी स्वतंत्र खाते उघडण्यास सांगण्यात यावे. यासाठी अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व बँकांना सूचना कराव्यात. त्याचबरोबर उमेदवारांना धनादेश लवकर मिळतील, यादृष्टीने कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.