आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरा वर्षांनी अभिनंदन, तेच अमूल्य पारितोषिक : अभयसिंह मोहिते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दहावीत बोर्डात पहिला नंबर आला नाही, याची सल कायम मनात राहिलेल्या वडिलांसाठी मोठे यश मिळवायचे आणि कोणत्या ना कोणत्या पद्धतीने प्रथम यायचे ही जिद्द बाळगली... आज ‘एमपीएससी’त राज्यात पहिला आलो, खूप आनंद वाटला, वडिलांना मोबाइलवरून सांगितले, आणि त्यांच्याकडून अकरा वर्षांनंतर अभिनंदनाचा पहिला शब्द ऐकला, हेच माझ्यासाठी मोठे पारितोषिक ठरले.. अशा भावना व्यक्त केल्या मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील अभयसिंह मोहिते यांनी...

एमपीएससी परीक्षेत ४७० गुणांसह राज्यात प्रथम आलेल्या अभयसिंह याने सर्वप्रथम "दिव्य मराठी'च्या सोलापूर कार्यालयात सदिच्छा भेट दिली. त्या वेळी तो बोलत होता. उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या अभयसिंहला आपण राज्यात प्रथम क्रमांक पटकावू असे वाटलेही नव्हते. तो आजच सोलापूरला एमपीएससीची पूर्वपरीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षा देऊन बाहेर पडल्यानंतर मोबाइल सुरू केला तेव्हा मित्राने फोन करून त्याला ही खुशखबर दिली.

माेबाइलपासून दूर राहिलाे
अभयसिंह म्हणाला, इंग्रजीची भीती मनात होतीच. म्हणूनच बी.ई. नंतर आठ ते दहा मोठ्या कंपन्यांनी संधी नाकारली. भाषेला ग्रामीण टच, आत्मविश्वासाचा अभाव यामुळे असे होत होते. नंतर तयारी केली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. जास्त वेळ अभ्यासही नाही केला. एक केले. मोबाइलपासून मात्र दूर राहिलो. अभ्यासावर लक्ष केंद्रित केले, मन लावून अभ्यास केला आणि यश मिळवता आले.

मित्राकडून प्रेरणा
दहावीनंतरच स्पर्धा परीक्षा द्याव्यात असे वाटले. बारावीनंतर इंजिनिअरिंगकडे गेलो. पास होत गेलो. पण त्यातील काहीही येत नाही. उपळाईचा स्वप्निल पाटील आयआरएस झाला आहे, त्याच्या सहवासातून प्रेरणा मिळत गेली. स्पर्धा परीक्षेचा हा तिसरा अटेम्प्ट होता. त्यानंतर हे यश पटकावता आले.

कौटुंबिक वातावरण आणि साधेपणाही
कचरेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, मंगळवेढ्याच्या इंग्लिश स्कूलमधून दहावी आणि सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स शाखेची बी.ई. पदवी घेतली आहे. गावाकडचे छपराचे घर आत्ता आत्ता पक्के बांधून उभे राहिले. वडील अर्जुनराव हे मोडनिंब येथे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनिअर आहेत. आई अनिता या गृहिणी तर वयाने तीन वर्षांनी लहान असलेली बहीण अस्मिता मोहिते ही टीसीआयमध्ये अभियंता आहे. तिचेही माझ्या यशात मोठे योगदान आहे. दोन भाऊ आहेत. एक भाऊ विक्रम शेती पाहतो.

कोचिंग लावले नाही
मराठी भाषेतून आणि ग्रामीण भागातून शिक्षण घेतले तरी यश निश्चित मिळवता येते. स्पर्धा परीक्षेसाठी कधी कोचिंग लावले नाही. पेपर वाचणे, इंग्रजीवर भर देणे आणि विविध स्पर्धा परीक्षा देत राहणे हेच यशाचे गमक आहे. न्यूनगंड काढून टाका. गावाकडे शैक्षणिक वातावरण नसले तरी मित्रांसमवेत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे, असे अभयसिंह यांनी सांगितले.