आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरेवाडीचा अभयसिंह मोहिते एमपीएससीत प्रथम, सोलापूर जिल्ह्याचा निकालात दबदबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा / बार्शी / कुर्डुवाडी - राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कचरेवाडीच्या अभयसिंह अर्जुन मोहितेने ४७० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच माढा, अनगरमधील (ता. मोहोळ) प्रत्येकी एक आणि बार्शी तालुक्यातील सात अशा जिल्ह्यातील दहा जणांनी परीक्षेत बाजी मारली.
राज्य लोकसेवा आयोगाने २०१४ मध्ये परीक्षा घेतली होती. रविवारी (दि. ५) निकाल जाहीर झाला. अभयसिंह राज्यात पहिला आल्याचे वृत्त धडकताच कचरेवाडीने दिवाळी साजरी केली. मंगळवेढा तालुक्याच्या इतिहासातच प्रथमच हा इतिहास घडला आहे. अभयसिंह अहमदनगर जिल्हा परिषदेत साहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण कचरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक मंगळवेढ्याच्या इंग्लिश स्कूलमध्ये झाले. सातवीत शिष्यवृत्ती परीक्षेत अभयसिंहने राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. तो कॉम्प्युटर इंजिनिअरही आहे. यापूर्वी २०१३ मध्ये त्याची विक्रीकर निरीक्षक पदावर निवड झाली होती.
मुलगा कलेक्टर होईल
मुलगा जिल्हाधिकारी व्हावा, ही इच्छा आहे. तो ती पूर्ण करेल, असा विश्वास अभयसिंहचे वडील अर्जुन आई अनिता यांनी व्यक्त केला. मोहिते कुटुंबीय शेतात राहते. अभयसिंहने राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याचे कळताच ग्रामस्थांसह परिसरातील आणि तालुक्यातील अनेक मंडळींनी शुभेच्छा देण्यासाठी घरी गर्दी केली होती. मोहिते कुटुंबीयांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता. अभयसिंहचे प्राथमिक शाळेतील शिक्षक पी. आर. माळी मारुती काळुंगे यांनीही आनंद व्यक्त केला.

बार्शीच्या सातजणांचा समावेश
बार्शी तालुक्यातील सातजण राज्य लोकसेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यातून श्रीकांत औदुंबर डिसले (४३२ गुण, रा. जवळगाव), मिताली मुकेश संचेती (३७७, बार्शी) याची पोलिस उपअधीक्षक, अश्विनी दिगंबर डमरेची (४०१, खामगाव) तहसीलदार, अविनाश प्रकाश पिसाळची (४१३, पिंपळगाव पान), आनंदकुमार सौदागर मिरगणेची (४०२, मांडेगाव) साहाय्यक गटविकास अधिकारी, अनुप बसवराज पुराणिकची (३७८, बार्शी) राज्य उत्पादन शुल्कच्या साहाय्यक आयुक्तपदी, किशोर सुरेश िमरगणेची (मांडेगाव) नायब तहसीलदारपदी निवड झाली.

सध्या डिसले हा उस्मानाबाद जिल्हा परिषदेत परीवेक्षाधीन उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदावर तर मिताली संचेती अंबरनाथ पालिकेत मुख्याधिकारी आहे. डमरे याचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण खामगावच्या माई सोपल प्रशालेत झाले. एमएस्सी अॅग्रीनंतर त्याने ही परीक्षा दिली. अविनाश पिसाळ शेतकरी कुटुंबातील आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षण पिंपळगाव आणि साकत तर उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण बार्शीच्या सुलाखे शिवाजी महाविद्यालयात घेतल्यावर पुण्याच्या जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय आणि व्हीव्हीआयपी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी त्याने घेतली.

कांदलगावचे दोन भाचे यशस्वी
श्रीकांत डिसले हा कांदलगावचे संजय करडे यांचा तर अविनाश पिसाळ हा दत्तात्रय करडे यांचा भाचा आहे. करडे कुटुंबीयांचे दोन भाचे राज्य लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनल्याने कांदलगावात जल्लोष करण्यात आला.

थोरबोले १२ वा, काळे ३९ वा
माढ्याच्या अजित प्रकाश थोरबोलेने ३८१ गुण मिळवत राज्यात बारावा क्रमांक मिळवला. तो आयुर्वेदात पदवीधर असून त्याचे प्राथमिक शिक्षण उपळवटे, माध्यमिक शिक्षण माढ्यात तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या दयानंद महाविद्यालयात झाले आहे. तसेच अनगरच्या विवेक विठ्ठल काळेने राज्यात ३९ वा क्रमांक मिळवला.

दुसरी परीक्षा आणि फोन...
अभयसिंहराज्य लोकसेवा आयोगाची दुसरी परीक्षा देण्यासाठी सोलापुरात आला होता. परीक्षा देऊन हाॅलमधून बाहेर पडतानाच मित्राने भ्रमणध्वनीवरून वार्ता सांगितली.

पित्याच्या कष्टाचे चीज
अभयसिंहाची कौटुंबिक परिस्थिती नाजूक आहे. पित्याने मोठ्या कष्टाने त्याचे शिक्षण पूर्ण केले. पिता अर्जुन हे सध्या पाटबंधारेच्या उजनी विभागात मोडनिंब येथे कनिष्ठ अभियंतापदावर कार्यरत आहेत. पगार वेळेवर होत नसल्यामुळे मुलाच्या शिक्षणात अनंत अडचणी आल्या. त्यावर मात करून त्यांनी मुलाला शिकवले.

बहीण इंजिनिअर, भाऊ शेतकरी
अभयसिंहचाभाऊ विक्रमचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून तो शेती करतो. बहीण अस्मिता इंजिनिअर असून पुण्याच्या टाटा कन्सल्टिंगमध्ये कार्यरत आहे. आई अनिता गृहिणी आहेत. त्यांची चार एकर जिरायत शेती आहे.