आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या रेल्वेत चढणारा हात निसटून चाकाखाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्थानकावरून सुटलेली हुतात्मा एक्स्प्रेस पकडताना हात निसटून चाकाखाली पडल्यामुळे एकाला पाय गमवावा लागला. गुरुवारी सकाळी सोलापूर स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर ही दुर्घटना घडली. विजय पांडुरंग कोलाल (वय 35, रा. लोकसेवा हायस्कूल, शास्त्रीनगर) असे त्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे.

विजय कोलाल हे सकाळी गाडीच्या वेळेपेक्षा थोडे उशिरा पोहोचले. गार्डने सिग्नल दिल्यानंतर गाडी सुरू झाली. गाडी निघाल्यानंतर विजय यांनी धावतच आत चढण्याचा प्रयत्न सुरू केला. गार्डच्या डब्यापासून शेवटच्या तीन क्रमाकांच्या डब्यात प्रवेश करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. गाडीचा वेग वाढत असल्याने अँगलवरून हात सुटला अन् काही कळायच्या आत विजय चाकाखाली आले. गाडी पुढे गेल्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्लीपरच्या दिशेने धाव घेतली. विजय रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कंबरेपासून त्यांचा पाय तुटला. प्रशासनाने तातडीने डॉक्टरांना बोलावून घेतले. विजय यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तोल सांभाळा, वेळेत या
फलाट आणि डब्यातील साधारण अंतर 9 ते 12 इंच असते. पायर्‍यांवरून चढताना अथवा उतरताना तोल गेल्यास प्रवासी गाडी खाली येऊ शकतो. ही दुर्घटना तशीच घडली. स्थानकावरून सुटताना गाडीचा वेग ताशी एक ते 15 किलोमीटर असतो. त्यामुळे पळत जाऊन आत चढण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. हुतात्मा, इंद्रायणी, सिद्धेश्वर, यशवंतपूर, पुणे, विजापूर पॅसेंजर आदी गाड्या सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुटतात. या गाड्यांच्या वेळा, त्यांचे फलाटे हे आधीच ठरलेले असतात. प्रवाशांनी गाडी सुटण्यापूर्वी किमान 15 मिनिटे अगोदर संबंधित फलाटावर थांबल्यास अशा दुर्घटना टाळता येतील.


बेफिकिरी करू नका
स्थानकावरून गाडी सुटताना अथवा थांबताना प्रवाशांनी गडबड करू नये. गाडी सुटण्यापूर्वीच आत चढावे आणि गाडी थांबल्यानंतरच खाली उतरावे. एका क्षणाचीही बेफिकरी आपले प्राण संकटात आणू शकते. सुशील गायकवाड, वरिष्ठ व्यवस्थापक