आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या लग्नाची खरेदी करून घराकडे परतणार्‍या महिलेचा ट्रक अपघातात मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुलीच्या लग्नाची खरेदी करून बाजारातून घरी परतताना एका महिलेला ट्रकने उडवले. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी अकराच्या सुमारास चौपाड येथील विठ्ठल मंदिरासमोर घडली. फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.


पन्नास वर्षीय छाया जगन्नाथ जमदाडे (रा. मंगळवेढेकर चाळ, सोलापूर) या मुलीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी मुलगा सौरभ यांच्याबरोबर चौपाड येथून काही साहित्यांची खरेदी उरकून घराकडे परतत होत्या. तेवढय़ात मागून आलेल्या ट्रक (एम एच 13, आर 8240)ने त्यांना उडवले. अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. गंभीर जखमी अवस्थेत त्या रस्त्यावर कोसळल्या. चौदा वर्षीय मुलगा ‘मदत करा, माझ्या आईला वाचवा’ अशी आर्त हाक देत होता. या गोंधळात 15 ते 20 मिनिटे जखमी महिला जागीच पडून होती. सुमारे 20 मिनिटांनंतर घटनास्थळी पोलिस पोहोचले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. दरम्यान, मंगळवेढेकर चाळीतील नागरिक धावपळ करत आले आणि जमदाडे यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आणि संध्याकाळी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

22 फेब्रुवारीला होते मुलीचे लग्न
मृत छाया जमदाडे यांना प्रियंका आणि सौरभ अशी दोन अपत्य आहेत. प्रियंकाचे लग्न 22 फेब्रुवारी रोजी ठरले होते. सौरभ हा शिवाजी प्रशालेत नववीत शिकत आहे. छाया यांचे पती हॉटेलमध्ये कामाला आहेत. तर छाया या उद्यानामध्ये पापड आणि पॉपकॉर्न विकण्याचा व्यवसाय करत होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे ऐन लग्नासमोर घरात दु:खाचा डोंगर कोसळला. दोन्ही मुलांची ममता हिरावली गेली. त्यामुळे सर्वजण त्या दोघांना पाहून रडत होते. या घटनेने मंगळवेढेकर चाळीत हळहळ व्यक्त होत होती.

चालक झाला पसार
ट्रकची धडक लागताच ती महिला रस्त्यावर कोसळली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सौरभने ट्रक चालकास पकडण्याचा प्रयत्न केला. आसपासच्या नागरिकांनीही त्याला पकडण्यासाठी धावपळ केली, पण संधी साधून तोपर्यंत चालक पसार झाला.