सोलापूर - पूर्व भागातील दत्तनगरात बेकायदेशीर पाणी विक्रीच्या व्यवसायात एका 13 वर्षीय मुलाचा मंगळवारी सकाळी बळी गेला. मार्कंडेय जलतरण तलावात पोहून घरी सायकलवर जाताना पाण्याच्या टँकरने ठोकरले. त्यात सनी नागेश र्शीगिरी (वय 13, रा. रविवार पेठ, सोलापूर) याचा मृत्यू झाला. तो आंध्र भद्रावती शाळेत शिकत होता. पाच दिवसांपूर्वी तो प्रथम श्रे णीतून उत्तीर्ण झाला होता.
मुलाचे वडील नागेश र्शीगिरी यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. टँकरचालक समीर पिरजादे (वय 35, रा. कोंडानगर) याला अटक झाली. सनी हा सकाळी नऊच्या सुमाराला घरातून बाहेर पडला. जलतरण तलावात पोहून घरी जाताना सिंधूराम रेसीडेन्सी समोरून येणार्या टँकर (एमटीएस 8901)ने त्याला धडक दिली. डोक्याला गंभीर जखम झाल्याने तो जागीच मृत झाला. अपघातानंतर चालकाने पलायनाचा प्रयत्न केला. पण, जमावाने त्याला पकडले. वाहनाची मोडतोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आले.
आता तरी पाणी विक्री बंद करा : दत्तनगर भागातील काही नागरिकांनी बोअर घेऊन पाणी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. येथून विकत घेतलेले पाणी एमआयडीसीतील उद्योगांना पुरवले जाते. आयुष्य संपलेल्या टँकरमधून बेकायदा पाण्याची विक्री होते. रस्त्यावर पाणी सांडत जाणार्या टँकरमुळे रस्ते उखडले आहेत. त्यामुळेच मंगळवारी अपघात झाला. त्यातून मुलाचा बळी गेला. एकाच्या बळीनंतर असा अवैध व्यवसाय बंद होईल, अशी अपेक्षा येथील नागरिक अशोक बल्ला व्यक्त केली.
.: सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत शहरात जडवाहतुकीला बंदी आहे. पण आयुष्य संपलेल्या टँकरला जिल्हा प्रशासनाने ‘अत्यावश्यक सेवा’ म्हणून प्रमाणपत्र दिले आहे. या पाण्याला ‘अत्यावश्यक सेवा’चे प्रमाणपत्र कसे मिळाले? आयुष्य संपलेल्या टँकरला देता येते का? आरटीओ अशा टँकरवर कारवाई करत नाहीत का? असे प्रश्न पुढे आले आहेत.