आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताने लेखक झालो, प्रभावळकर यांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अभिनय करता करता मी अपघाताने लेखक झालो, मी स्वत:ला साहित्यिक समजत नाही. माझ्या छंदाचा व्यवसाय झाला आहे. मी संपादक आणि प्रकाशकांचा लेखक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर यांनी केले.


शहरातील डॉ. फडकुले सभागृहात आयोजित कार्यक्रमात मंगळवारी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कारांचे थाटात वितरण करण्यात आले. यावेळी सत्कारमूर्ती प्रभावळकर बोलत होते. यावेळी अभिनेते दिलीप प्रभावळकर (पत्रापत्री), विजय केंकरे (त्यांची नाटकं), संजय मेश्राम (सलाम मलाला) यांना साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच टिकेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


व्यासपीठावर सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, पत्रकार नारायण कारंजकर, बळीराम सर्वगोड, तात्यासाहेब पवार, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक माजी खासदार रणजितसिंह मोहिते आणि अध्यक्ष रामचंद्र मस्के आदी उपस्थित होते. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय रजनीश जोशी यांनी करून दिला.


आपला साहित्यिक प्रवास सांगताना प्रभावळकर म्हणाले, की अभिनय क्षेत्रात काम करताना अपघाताने साहित्य क्षेत्रात आलो. माझ्या साहित्य सेवेची सुरुवात एका पाक्षिकात झाली. क्रि केटविषयी लिहिलेल्या कॉलमवरून गुगली नावाचे पहिले पुस्तक निघाले. माझ्यातील नट आणि लेखक एकमेकांना पूरक आहेत. लेखनाला खूप महत्त्व आहे. विडंबन लेखन आणि तिरकसपणे घेतलेला वेध या पुस्तकात आहे, असे ते म्हणाले.


त्तपत्रानी लोकहितवादी भूमिका मांडवी
अरुण टिकेकर : पत्रकारितेत मागील दहा वर्षांत प्रचंड बदल झालेले आहेत. मोठय़ा प्रमाणावर व्यावसायिकता आल्याने वृत्तपत्रात स्पर्धाही वाढली आहे. स्पर्धेच्या या काळातही वृत्तपत्रांनी आपली लोकहितवादी व निष्पक्ष भूमिका सोडता कामा नये. समाजातील प्रत्येक घटक मतलबी झालेला आहे. त्यामुळे समाजातील नीतीमत्तेला धक्के लागत आहेत.


उत्सुकतेपोटी उर्दू शिकल्याचा फायदा
संजय मेश्राम : उत्सुकतेपोटी शिकलेली उर्दू कामी आली. नक्षी म्हणून काढलेली अक्षरे नंतर किती सुंदर शेर आहेत हे समजले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर राहणार्‍या मलालाने लिहिलेल्या डायरीत सत्यतेचे दर्शन आहे. मलाला कोणत्या देशात राहते, यापेक्षा तिने स्त्रियांविषयी केलेले कथन महत्त्वाचे आहे.


देशातील नाट्यगृहे अद्यायावत हवीत
विजय केंकरे : 1998 मध्ये फॅन्टम ऑफ ऑपेरा पाहिला, तसेच लंडनची रंगभूमी, अमेरिका व तेथील नाटके पाहिली. प्रतिवर्षी पाहतो. माझी निरीक्षणं मी या पुस्तकात लिहिली आहेत. परदेशात नाटके पाहण्याची पॅशन आणि फॅशन आहे. एकाच इमारतीत चार-पाच नाट्यगृहे असणारी नॅशनल थिएटरसारखी वास्तू आपल्याकडे नाही, याची खंत आहे. आपल्याकडेही थिएटर अद्यायावत हवीत.