आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या कार्यकर्त्यांनाही येताहेत आता 'अच्छे दिन'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता येताच त्याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसून येत आहेत. शहरातील दोन प्रभागांतील पोटनिवडणुकीत युतीचे उमेदवार निवडून आले आणि कुंभारी पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीतही भाजपचा उमेदवार विजयी झाला. आगामी काळात सहकार क्षेत्रात तज्ज्ञ संचालक निवडत असताना भाजप कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना अच्छे दिन येण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हणायला वाव आहे.

शहर आणि जिल्हा भाजपमधील दुरावा सर्वश्रुत आहे. तरीही पालकमंत्री या नात्याने विजयकुमार देशमुख ग्रामीण भागात फिरत आहेत. कुंभारी पोटनिवडणुकीत त्यांनी काही गावांमध्ये सभाही घेतल्या. आमदार सुभाष देशमुख यांनी संपर्क अभियानाचे प्रमुख म्हणून शहर आणि जिल्ह्यात लक्ष घातले. इतर वेळेत सुभाष देशमुख मतदार संघात फिरून कार्यकर्त्यांना जवळ ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपचे दोन्ही आमदार अंतर्गत स्पर्धक असल्याचे स्पष्टता यातून दिसून येत आहे.
महापालिका पोटनिवडणुकीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मतदार संघातील प्रभाग चारमधून भाजपच्या कांता भोसले विजयी झाल्या. त्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली हाेती. कुंभारी पोटनिवडणुकीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, आमदार सुभाष देशमुख यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. त्यामुळे तेथे अजय तेली विजयी झाले. राज्य केंद्रातील सत्तेमुळे पोटनिवडणुकीत भाजपचे पारडे झाले. यानंतर आगामी काळात आपल्या पदरात पदे पडतील, या अाशेने कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. सहकार क्षेत्रात भाजप कार्यकर्त्यांना तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती होईल.

महामंडळ, दक्षता कमिटी आदींवर लागेल वर्णी
महामंडळ,रोजगार हमी योजना, दक्षता कमिटी, जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्याचा अधिकार सत्ताधारी लोकप्रतिनिधींना असतो. त्यामुळे भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात युतीच्या कार्यकर्त्यांना "अच्छे दिन' येणार आहेत. त्यासाठी कार्यकर्तेही कामाला लागले आहेत.