आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतआतुनी दाटून आली विस्मृत काही स्मरणे..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - संगणक तज्ज्ञ, ख्यातनाम लेखक अच्युत गोडबोले यांचे आत्मचरित्र 'मुसाफिर' च्या विसाव्या आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी येथे होत आहे. त्यानिमीत्त टमुसाफिरट मधील काही वेचक परिच्छेद.

.. अशाच एका अवचित क्षणी 1959 मध्ये र्शीराम पुजारी (पुजारी सर) आमच्या आयुष्यात आले आणि आमच्या घराचा एक अविभाज्य घटकच होऊन राहिले. आमच्या घरात त्यांचं ते हक्काचं वावरणं, ते पहाडी दिलखुलास हसणं, ते सुंदर मार्मिक विनोद करणं, प्रत्येक लहानसहान गोष्टीत रस घेणं आणि खरं सांगायचं तर रसरशीतपणे प्रत्येक क्षण मजा घेत, भरभरून जगणं यांनी तर माझ्यावर चक्क जादूच केली होती. सरांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त होतं आणि त्यानं मी भारावून गेलो होतो. म्हटलं तर लौकिकार्थानं ते माझे शाळा-कॉलेजातले शिक्षक कधीच नव्हते. पण, त्यांच्यासारखा शिक्षक मला आयुष्यात मिळाला नाही. आयुष्य कसं जगावं याची ते म्हणजे आमच्यासमोरची एक चालतीबोलती शाळाच होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मोहिनी इतकी जबरदस्त होती, की त्यांच्यामागून जाण्याशिवाय गत्यंतरच उरलं नाही. त्यांना मी निराश, हताश, हतबल झालेले कधीच बघितलं नव्हतं. आजूबाजूचं सगळं जग हे स्वार्थ, चंगळवाद, पैसा, प्रतिष्ठा याच्यामागे धावत असताना यांच्या डोक्यात भलतेच विचार चालत असायचे. लोकांनी चांगलं वाचावं, शिकावं, बोलावं, गावं, हसावं आणि मुख्य म्हणजे खर्‍या अर्थाने जगावं, असंच त्यांना वाटे आणि हे करण्यासाठी जे जे करता येईल ते ते हा माणूस करायचा. .. कुठेही पूर किंवा भूकंप आला की मदतीसाठी पुढे येणार्‍यांपैकी पुजारीसर पहिले असत. कुणावर अन्याय झाला तर त्याविरुद्ध दंड थोपटणारे सरच असत. पुजारी सर प्रचंड धीट होते.

..सोलापूरला असताना कुमार गंधर्वांच्या अनेक मैफिली ऐकायला मिळाल्या. कुमार आले की पुजारीसरांकडे उतरायचे. मग तिथे गप्पांचा फड रंगायचा. मला आठवतंय, कुमार हातात अडकित्ता घेऊन सुपारी कातरत काहीतरी सांगत असत. मी चित्त एकवटून ते सगळं ऐकत असे. एकदा तर गाणं संपलं तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. त्यानंतर गप्पा सुरू झाल्या. त्या वेळी मात्र, मी सुलभाताई, पुजारीसर, कुमार गंधर्व आणि माझा मित्र प्रदीप कुलकर्णी एवढेच तिथे होतो. पुढचे तीन तास कसे गेले कळलंच नाही.

.. मला सुरेश देशमुख, प्रदीप कुलकर्णी, विश्वास काकडे, अनंत फडके आणि मोहन देशपांडे खूप जवळचे वाटायचे. प्रदीप तर माझा जिवलग मित्र. प्रदीपचा एक सगळ्यात चांगला गुण म्हणजे त्याची विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा! .. सोलापूरचे दिवस आणि लहानपण आठवताना आजही मन मागे खेचले जाते. गाडीतून जाताना जशी झाडं भराभर मागे पळताना दिसतात, तशीच आयुष्यातली वर्षं मागं जाऊन पुन्हा सोलापूरला त्याच वातावरणात शिरावंसं वाटतं. नकळत मग शांता शेळके यांच्या ओळी मनात हुरहुर निर्माण करू लागतात..

कोमल हळवी उदास झाली मावळतीची किरणे
आतआतुनी दाटून आली विस्मृत काही स्मरणे..!