सोलापूर- लहानपणापासून
आपला संबंध अक्षरांशी येतो. अक्षरे, शब्दांतून आपण अभिव्यक्त होत असतो. संदुर अक्षरांचे महत्त्व जरी आपणावर बिंबवले असले तरीही परीक्षेत अक्षरांपेक्षा आपण मार्कांना अधिक महत्त्व देत आलो आहे. आज अक्षरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. शब्दांना देखिल रूपं असतात. ते दृष्यरूपात मांडता येणं म्हणजे कॅलिग्राफी असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील प्रसिध्द कॅलिग्राफीतज्ज्ञ अच्युत पालव यांनी केले.
सोलापूर जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रंगभवन येथे आयोजित बौध्दिक व्याख्यानमालेचे आठवे पुष्प शनिवारी पालव यांनी गुंफले. मी आणि माझा अक्षर प्रवास हा व्याख्यानाचा विषय होता. पालव म्हणाले, अक्षरांतून जसे माणसांचा स्वभावा कळतो तशी विभिन्न राज्यांची कला संस्कृती देखिल कळते. आपला भारत देश जसा कृषिप्रधान आहे, तसा तो लिपीप्रधान आहे. वेगवेगळया भाषेच्या लिपी भारतात आढळतात.