आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या शहरातील अनधिकृत इमारतींवर शुक्रवारी (दि. १२) मोठ्या पोलिस बंदोबस्तात नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. दिवसभरात जेसीबी कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने अनधिकृत सात इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या.
ऑगस्ट २०१२ मध्ये सामाजिक कार्यकर्ते नागेश कदम यांनी शहरातील अनधिकृत इमारतींविषयी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या वेळी न्यायालयाने नगरपरिषदेस अशा इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यात ९३१ बांधकामांना परवानगी नसल्याचे आढळून आले. दरम्यान, यातील बहुतांश मालमत्ताधारकांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. शेवटी जुलै २०१४ मध्ये न्यायालयाने २३४ इमारतींवर कारवाई करण्याचे मुख्याधिकारी शंकर गाेरे यांना आदेश दिले होते.

सुमारे एक वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही अनधिकृत इमारतींवर कारवाई झाल्यामुळे याचिकाकर्ते कदम यांनी मुख्याधिकारी यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली होती. त्यावर येत्या काही दिवसांत सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुख्याधिकारी गोरे यांनी शुक्रवारी अनधिकृत इमारतींवर कारवाईला सुरुवात केली.
सकाळी नऊ वाजता स्टेशन रस्त्यावरील शेठ मुरारजी कानजी धर्मशाळेपासून कारवाईस सुरुवात करण्यात आली. यासाठी दोन जेसीबी, अग्निशामक वाहन, दोन ट्रॅक्टर १०० पोलिस कर्मचाऱ्यांचा फाटा तैनात होता. तुरळक विरोध वगळता ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जेसीबीसह नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हातोड्याने इमारती पाडल्या.
या इमारतींवर होणार आहे कारवाई
शुक्रवारी दिवसभरात मुरारजी कानजी धर्मशाळा, राजाराम इंग्लिश स्कूल, मंदिर परिसरातील शितोळे, भोसले यांच्या इमारतींवर कारवाई करण्यात आली. तर रत्नप्रभा मोहिते-पाटील विद्यालय, गेना पवार, अाशा जयवंत मुळे, अरिहंत कोठाडिया, नागेश मेटकरी, अरुण माळवे, दशनाम गोसावी समाज अध्यक्ष, अहिल्यादेवी होळकर ट्रस्ट व्यवस्थापक, दामाजी पंत मंगळवेढेकर मठ, शिवशाहीर बाबासाहेब देशमुख मठ, बेळगावकर मठ, रत्नप्रभा विश्वंभर माने आदींवर कारवाई करण्यात येणार आहे.
- पालिकेने २३४ इमारतींवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु न्यायालयाने ९३१ इमारतींवर कारवाईचे आदेश दिले होते. सर्व बांधकामांविरोधात कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहील.”
नागेश कदम, याचिकाकर्ते, पंढरपूर
- २३४ अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यापैकी सात इमारती शुक्रवारी जेसीबीने पाडण्यात आल्या. पाेलिस बंदोबस्ताच्या उपलब्धतेनुसार उर्वरित इमारतींवर कारवाई केली जाईल.”
बाळासाहेब कदम, प्रशासन अधिकारी, नगरपालिका, पंढरपूर
बातम्या आणखी आहेत...