आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्यावरील अत्याचार थांबवा - आदिवासी पारधी संघटनेच्या पदाधिका-यांची विनंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अदिवासी पारधी समाजातील शाळकरी मुले, महिला, तरुण यांच्यावर चौकशीच्या नावाखाली वारंवार अत्याचार होत आले आहेत. हे अत्याचार तातडीने थांबवून ख-या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक मकरंद रानडे यांना अदिवासी पारधी समाज संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले.

संघटनेच्या शिष्टमंडळाने डीवायएसपी चौगुले यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. घडलेल्या घटनेची चौकशी करू, असे चौगुले यांनी सांगितले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने पारधी समाजातील मुलांना अद्यापही नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश दिलेला नाही. मुलांची यादी देऊनही दुर्लक्ष केल्याची तक्रार संघटनेनी केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेश काळे, लक्ष्मी चव्हाण, अमोल शिंदे, मेनका चव्हाण, पप्पू काळे, संपत पवार, नागेश काळे, संभाजी पवार, अविनाश पवार, अनिल काळे, संगीता पवार आदी उपस्थित होते.

महिलांनाही मारहाण
सवतगव्हाण येथील पारधी वस्तीवरील महिलांनाही अमानुष पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली आहे. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे सपोनि झाडे, हवालदार गोळेकर, लांडगे व इतर कर्मचाºयांनी तपासाच्या नावाखाली महिलांना तीन-तीन दिवस एलसीबी कार्यालयात कोंडून मारहाण केल्याचे प्रकार घडल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

दाखले मिळावेत
आदिवासी विभागामार्फत राबवण्यात येणाºया योजनांसाठी जात, रहिवास, रेशनकार्ड अशा दाखल्यांची गरज असते. महसूल विभागाने स्वतंत्रपणे शिबिरे घेऊन प्रमाणपत्रे देण्याची व्यवस्था करावी. ग्रामीण भागात अनेक पारधी समाजबांधवांकडे कागदपत्रे नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. विकासापासून समाज दूर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकाराची दखल घेऊन प्रयत्न करावेत.

शाळकरी मुलांना मारहाण
एलसीबी शाखेकडून चौकशीच्या नावाखाली पारधी समाजातील शाळकरी मुलांना ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केली जात आहे. यामध्ये कंदर (ता. करमाळा) येथील राहुल पवार (वय 14), महेश पवार (वय 15), विशाल पवार (वय 19) , अतुल काळे, पक्या काळे, टिपू काळे, सचिन काळे (वय 16) या सातवी ते नववीपर्यंतचे शिक्षण घेणाºया मुलांवर अत्याचार केले जात आहेत.
सुधारण्याचे काम करावे
- माढा दरोड्यातील ते आरोपी आहेत. त्यासाठी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. संघटना त्यांच्यापरीने आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करते. त्यांना याची मुभा आहे. पण पोलिसही त्यांचे काम करत आहेत. संघटनेला यासंदर्भात काही बोलायचे असेल तर त्यांनी न्यायालयात म्हणणे मांडावे. समाजातील अशा प्रवृत्तीच्या लोकांना सुधारण्याचे काम केलेले बरे. पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे. मकरंद रानडे, पोलिस अधीक्षक