आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई : अक्कलकोटमधील 34 रेशन दुकानांचे परवाने रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी, दुधनी, हत्तीकणबस आदी गावांतील 34 रेशन दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण यांनी ही कारवाई केली. बोगस लोकांना धान्य वाटप करणे, शासकीय धान्य काळ्या बाजारात विकणे आदी गंभीर स्वरूपाचे दोष या दुकानदारांच्या तपासणीत आढळून आले. त्यांच्या विरोधात पोलिसांत फिर्यादही देण्यात आली; परंतु पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. त्यानंतर पुरवठा खात्याने ही मोठी कारवाई केली.

गतवर्षी केली होती तपासणी
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शहर आणि जिल्ह्यातील रेशन दुकानांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. अक्कलकोटचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी गावागावांतील दुकाने तपासली. दोष आढळून आलेल्या 44 दुकानांचे दप्तर ताब्यात घेऊन दीड महिना तपास केला. मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी हा तपास केला. त्यानंतर अहवाल जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे दिला. त्यातील गंभीर दोषांची दखल घेऊन दुकानदारांच्या विरोधात अक्कलकोट पोलिसांत फिर्यादही देण्यात आली. परंतु पोलिसांनी पुढील कारवाईच केली नाही.

पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी दोषी दुकानदारांचे परवाने रद्द का करू नयेत, अशी विचारणा करणा-या नोटिसा बजावल्या. त्यावर सुनावणी ठेवली. दुकानदारांनी युक्तिवाद केला; परंतु तो समाधानकारक नसल्याचे सांगत चव्हाण यांनी 34 दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले. त्यामुळे अक्कलकोटच्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. त्यांनी राजकीय दबाव आणला होता. परंतु त्याला न जुमानता जिल्हा प्रशासनाने ही मोठी आणि कठोर कारवाई केली. त्याचे सामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.

या गावांतील दुकाने बंद
उडगी येथील दोन, मैंदर्गी आणि दुधनी गावातील सात तर नागारे बणजगोळ, हत्तीकणबस, बबलाद, जकापूर, बासलेगाव, कल्लप्पावाडी, बोरोटी, चिक्केहळ्ळी, बोरोटी खुर्द, भोसगे, बिंजगेर, परमानंद तांडा, चिंचोली, हालहळ्ळी, सलगर, संगोगी, इब्रामपूर, आंदेवादी, मुगळी येथील दुकानांचे परवाने रद्द झाले.

‘दिव्य मराठी’चा पाठपुरावा
रेशन दुकानदारांच्या गैरकारभाराविषयी ‘दिव्य मराठी’ने सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार दुकानांची तपासणी मोहीम राबवली. त्यातून दुकानदारांचे दोष सिद्ध झाले. त्यानंतरही होणा-या कारवाईकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष ठेवले होते. त्यामुळेच दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द झाले.

आता पोलिसांकडे लागले आहे लक्ष
दुकानदारांच्या बोगसगिरीचे पुरावे प्रशासनाने दिले तरीही अक्कलकोट पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाची तक्रार दाखल करून घेतली. दोषांचे अवलोकन करून पोलिसांनी कलम लावले असते तर दोषी दुकानदार आज तुरुंगात गेले असते. परंतु तशी कारवाई झाली नाही. प्रशासनाच्या कारवाईनंतर आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.