आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडीने कर्करोग झाल्याचा पुरावा नाही, आडम मास्तरांनीही ओढली दिलीप गांधींची री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विडी ओढल्याने कर्करोग आणि मृत्यू झाला असा एकही कागदोपत्री पुरावा आतापर्यंत निदर्शनास आलेला नाही. कारण विड्यांसाठी वापरण्यात येणारी तेंदूची पाने जंगलातून आणली जातात. त्यात आयुर्वेदिक गुणधर्म असतो. त्यातून येणारा धूर हा नैसर्गिक आहे, असा तर्क मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव नरसय्या आडम यांनी रविवारी मांडला.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी तंबाखूमुळे कर्करोग होत असल्याचा कोणताही भारतीय पुरावा उपलब्ध नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर देशभरातून मोठी टीकाही झाली होती. रविवारी लाल बावटा विडी कामगार युनियन (सिटू)च्या वतीने आयोजित कामगारांच्या मेळाव्यात आडम मास्तरांनीही गांधी यांचीच री ओढली. ‘मद्यपान, तंबाखू, गुटखा, मावा, जर्दा यांपासून दाढेचा कर्करोग होतो. त्याने अनेक लोक दगावले. याची जिवंत उदाहरणे आहेत. परंतु या गोष्टी सोडून विडी उद्योगावरच घाला घालणे योग्य नाही. या उद्योगावर सोलापुरात ७० हजार कामगारांची उपजीविका चालते,’ असेही ते म्हणाले.

विमाने, गाड्या बंद करायच्या का? : धूम्रपानामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्य धोक्यात येते, असे गृहीत धरल्यास विमान, रॉकेट, रेल्वे, जहाज, रिक्षा, दुचाकी, चारचाकी यातून निघणारा धूर अतिशय धोकादायक आणि आरोग्यास हानिकारक आहे. म्हणून ही वाहने चालवण्याचे सोडून द्यायचे का, असा प्रश्नही आडम यांनी उपस्थित केला.

आडम मास्तरांचे (वि) तर्क...
- कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा अधिक घेतल्याने त्याचे दुष्परिणाम जाणवतात. कर्करोगाचेही तसेच आहे. धूम्रपानाचा अतिरेक झाल्यास कर्करोग होऊ शकतो. पण मागील शंभर एक वर्षांत विडी आेढल्याने कर्करोग झाल्याचे ऐकिवातही नाही.
- बहुराष्ट्रीय कंपन्या यांत्रिकीकरणातून सिगारेट बनवतात. त्यात वापरण्यात येणाऱ्या तंबाखूवर रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्याचा धूर अतिशय घातक असतो. त्याने कर्करोग होतो हे अनेक संशोधनांतून दिसून आलेले आहे.

नेते असे का बोलताहेत?
तंबाखूजन्य उत्पादनांच्या वेष्टनांवर ६५ टक्के भागात धोक्याची सूचना लिहिण्याची सक्ती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली. त्यामुळे विडी उत्पादक असणारे खासदार तंबाखूची पाठराखण करत आहेत. तंबाखू रोखण्यासाठी संसदीय समिती नियुक्त करण्यात आली. त्याचे अध्यक्ष नगरचे खासदार दिलीप गांधी आहेत. त्यांनी सिगारेट अथवा विडी ओढल्याने कर्करोग होत नाही, असे वक्तव्य संसदेत केले. त्यांच्या पाठोपाठ विडी उत्पादक असणारे श्यामाचरण गुप्ता, रामप्रसाद वर्मा यांनीही गांधी यांचीच ‘री’ ओढली. आता आडमही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसले.