सोलापूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणातील व्यग्र वेळेतून स्वत:चा फोटोग्राफीचा छंद जोपासला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी गडकिल्यांची छायाचित्रे टिपली होती. त्याद्वारे गडकिल्ल्यांचा इतिहास अन् त्यांच्या संवर्धनाची मोहीम सुरू झाली. काही वर्षांपूर्वी आषाढी वारीत संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे हेलिकॉप्टरमधून छायाचित्र केले होते. पालखी सोहळ्यातील त्यांनी टिपलेले वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रांचे
पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. गडकिल्ले अन् वारीतील छायाचित्रांनंतर उद्धव ठाकरे हे आता वाइल्डलाइफ फोटोग्राफीच्या प्रेमात आहेत. सोमवारी त्यांनी सोलापुरातील नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक पक्षी अभयारण्यात येऊन वन्यजीवांचे छायाचित्रण केले. या वेळी त्यांच्यासोबत चिरंजीव तेजस ठाकरे उपस्थित होता. पावसाळ्यात गवत वाढल्यावर फोटोग्राफीस मी नक्की येणार, अशी कॉम्प्लिमेंट वनाधिका-यांना देऊन ते परतले.
फोटोग्राफीसाठी ठाकरे सोमवारी खासगी विमानाने सोलापूरच्या दौ-यावर होते. त्यांचा दौरा खासगी असल्याने प्रशासनातील निवडक अधिका-यांसह पक्षाच्या चार-दोन नेत्यांना त्याबाबतची माहिती होती. सकाळी साडेसात वाजता ठाकरेंचे विमान सोलापुरात दाखल झाले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव डॉ. प्रवीणसिंह परदेशी, मुलगा तेजस ठाकरे, मिलिंद नार्वेकर होते. त्यांचा ताफा आठ वाजता नान्नज येथील माळढोक अभयारण्यात दाखल झाला. पुणे वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी ठाकरेंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नेहमी पांढ-याशुभ्र वेशभूषेत असणारे उद्धव ठाकरे हे पँटशर्ट, गळ्यात कॅमेरा अन् डोक्यावर पांढरी गोल टोपी अशा पेहरावात होते. अभयारण्यातील निरीक्षण
टॉवर येथे त्यांचा ताफा दाखल झाला. ठाकरे त्यांचा कॅमेरा व लेन्स घेऊन उतरले अन् चालत थेट लपणगृहाकडे गेले.
या वेळी तेजसने वडील फोटाेग्राफी कशी करतात याची माहिती घेतली. उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी अभयारण्यात मनसोक्त हुंदडणा-या काळविटांचे अनेक कळप दिसताच
त्यांची विविध अँगल्सनी छायाचित्रे त्यांनी कॅमे-यात टिपली. त्यानंतर मार्डी पठारावर माळटिटव्या दिसल्या. ड्रीमलँड परिसरात पखुर्ड्या, चंडोल अन् गळ्यावर लाल व निळ्या रंगाची छटा असणा-या मोठा सरड्याचे छायाचित्र त्यांनी टिपले.
साडेअकरा वाजता पुन्हा शंभर हेक्टर येथील लपणगृहात माळढोकांना पाहण्यासाठी ठाकरे जाऊन बसले. वाइल्फलाइफ फोटोग्राफीसाठी ठाकरे यांनी दीड महिन्यापूर्वी बांधवगड (मध्य प्रदेश) अभयारण्यात वाघांचे फोटो काढले होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी ताडोबा अभयारण्यात वन्यजीवांची छायाचित्रे काढली होती.
ठाकरेंनी लुटला भोजनाचा आस्वाद
लपणगृहात पाच-सात कॅमे-यांच्या क्लिकचा आवाज अन् एकेकांना हातांनी खाणाखुणा सुरू होत्या.
आपसात गप्पा सुरू होताच आपण जंगलात असून वन्यजीवांना त्रास होईल, हळू बोला, अशा सूचना ठाकरे देत होते. माळढोकांच्या दर्शनानंतर दीड वाजता सर्वांनी अभयारण्यातील लपणगृहात बसून वनभोजनाचा आनंद घेतला.
तेजसचा वन्यजीवांचा दांडगा अभ्यास
उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस यांचा वन्यजीवांचा अभ्यास चांगला आहे. जंगल सफारी करीत असताना दिसणा-या पक्ष्यांची नावं अन् त्यांचे वैशिष्ट्य ते पटापट सांगत होते. तसेच इतर ठिकाणी आढळलेल्या प्रजातींची, त्यांच्याशी साधर्म्य असणा-या इतर पक्षी व प्राण्यांची माहिती ते आवर्जून सांगत होते. तेजस यांच्या वन्यजीवांबद्दलचा अभ्यास अन् निरीक्षणशक्तीने वन अधिकारीही थक्क झाले.