आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माणुसकीसाठी करावी लागली प्रतीक्षा, अपघातानंतर अर्ध्या तासाने मिळाली मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बाळे उड्डाणपुलाजवळ मागून आलेल्या ट्रकने दुचाकीला ठोकरले. अपघातानंतर ट्रकने पळ काढला. या धक्क्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. दुचाकीवरच्या त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांना जबर मार लागला. बघ्यांची गर्दी झाली. जखमी पतीला मदत मिळावी यासाठी पत्नी टाहो फोडत होती. पण अर्ध्या तासापर्यंत कोणीही पुढे आला नाही. नंतर आलेल्या एका तरुणाने माणुसकी दाखवत जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला घडली. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
जावेद शेख (वय ४०, दक्षिण तालुका) हे पत्नी मर्जिना (वय ३५), मुलगा इरफान (वय ११), मुलगी महेक (वय ६) असे चौघेजण दुचाकीवर हिप्परगा ते गुळवंची असा प्रवास करत होते. यावेळी बाळे उड्डाणपुलाच्या वळणावर मागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे दुचाकी पुलाच्या भिंतीला जाऊन जोरात आदळली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आणि तिघेही जखमी झाले. यावेळी नितीन बनसोडे हा तरुण मदतीला धावून आला. त्याने जखमींना शासकीय रुग्णालयात पोहोचवले.
पोलिस, रूग्णवाहिकेसाठी फोन करूनही नाही मिळाली मदत
रक्तबंबाळ होऊन पडलेल्या पतीच्या मदतीकरता पत्नी विनवण्या करत होती. परंतु तेथे उपस्थित असलेल्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. जखमीला रिक्षात बसवण्याकरता कोणीही पुढे येत नव्हता. कसा धक्का लागला, ट्रक कुठला होता, तुम्ही कुठले अशी चौकशी करण्यात ते वेळ घालवत होते. परंतु नितीन बनसोडे हा तरुण पुढे आला. त्याने शंभर नंबर आणि रुग्णवाहिकेला संपर्क केला, पण कोणीही फोन उचलला नाही.
अशा अवस्थेत नितीनने हिम्मत दाखवत रिक्षा बोलावली आणि रिक्षात चौघांनाही बसवून रुग्णालयात हलवले. इतकेच नाही तर शासकीय रुग्णालयापर्यंत येऊन नितीनने त्या चौघांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना पाणी आणून दिले. त्यांची संमती घेऊनच तो परतला.
बातम्या आणखी आहेत...