आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा रखडणार ड्रेनेज योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरकरांना ड्रेनेज सुविधा देणार यासाठी २०११ पासून अतिरिक्त यूजर चार्ज घेण्यात येत आहे. नगरोत्थान योजनेतून १८७ कोटींचे काम २१२ कोटींपर्यंत नेले. ५२ टक्के वाढीव मक्ता देण्यात आला. यामध्ये ५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवक मनोहर सपाटे यांनी केला. त्या आरोपाची चौकशी झाली नाही. २६ फेब्रुवारी २०१४ पर्यंत योजना पूर्ण होणे अपेक्षित होते; पण योजना अर्धवट राहिली. नागरिकांच्या माथी यूजर चार्ज मारले. आताची परिस्थिती पाहिली तर ही योजना पुढे नेण्यासाठी महापालिकेकडे आर्थिक तरतूद नाही. वेळेत कर्ज मंजूर झाले नाही तर योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. नागरिकांकडून वसूल केलेले ३२.६८ कोटी रुपयांचे काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे. राज्यात नव्याने सत्तेत आलेले युती सरकार निधी देत नाही असा आरोप कांॅग्रेसने केला आहे, तर कांॅग्रेसच्या कार्यकाळात योजना पूर्ण होण्याचे ठरले असताना कांॅग्रेसचा आरोप खोटा असल्याचे भाजपने म्हटले आहे. एकूण ड्रेनेज प्रकल्प आणखी काही काळ रखडणार असे स्पष्ट होत आहे.

नागरिकांच्या माथी
महापालिकेच्याहिश्श्यापोटी शासनाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड नागरिकांकडून यूजर चार्ज घेऊन करणार अशी हमी महापालिकेने शासनाला लेखी दिली. त्यानुसार ३२ कोटी रुपये वसूल केले. परंतु मनपाने २१.२१ कोटीच खर्च केले. ड्रेनेजपोटी नागरिकांकडून वसूल केलेल्या रकमेपैकी सुमारे ११ कोटी रुपये पालिकेने दुसऱ्याच कामासाठी वापरले. यूजर चार्ज वसूल केले, मात्र सोय केली नाही. नागरिकांना दरवर्षी ६०० रुपये भुर्दंडचा प्रकार महापालिकेने सुरू केला आहे.

तर योजना गुंडाळण्याची शक्यता
महापालिकेचीआर्थिक स्थिती पाहता ही योजना वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. योजना गुंडाळल्यास सांडपाण्याचा प्रश्न उभा राहील. प्रदूषणामुळे पर्यावरण धोक्यात येईल. यूजर चार्ज भरणाऱ्या नागरिकांची फसवणूक होईल.

राज्यात युतीचे सरकार आल्यामुळे रखडले आहे ड्रेनेजचे काम
राज्यात आमचे सरकार सत्तेत असताना ड्रेनेज कामासाठी निधी देण्यात आला. परंतु आता भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर या योजनेसाठी निधी मिळालेला नाही. त्यामुळे हे काम रखडले आहे. सोलापुरातल्या आगामी महापालिका निवडणुकीत याबाबत नागरिकांना आम्ही सांगू. राज्य सरकारने निधी िदला नाही तर ही योजना करणे शक्य होणार नाही. नागरिकांच्या यूजर चार्जची रक्कम या योजनेसाठी खर्च केली.'' संजयहेमगड्डी, मनपा सभागृह नेता
ड्रेनेज योजनेसाठी आता महापालिकेकडे निधीच उपलब्ध नाही. त्यामुळे काम मंदावले आहे. पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण होणे अशक्य आहे. १५० कोटींच्या निधीसाठी महापालिकेने हुडको या वित्तीय संस्थेकडे मागणी केली असली तरी मंजुरी मिळण्यास कालावधी लागणार आहे. २०१४ मध्ये योजना योजना पूर्ण होऊन कार्यान्वित होणे अपेक्षित होते, पण पूर्ण झाले नाही. दुसऱ्यांदा दिलेल्या मक्त्यानुसार आता डिसेंबर २०१५ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. पण पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. परिणामी यूजर चार्ज देऊनही सोलापूरकरांना ड्रेनेज सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.

कर्ज मंजुरीस हुडकोची तत्त्वत: मान्यता
महापालिकेनेगेल्या शुक्रवारी कर्ज मागणीची फाइल हुडकोकडे सादर केली आहे. कर्ज मंजूर करण्यास हुडकोने तत्त्वत: मान्यता दिली आहे. राज्य शासनाकडून हमीपत्राची गरज आहे. त्यासाठी नगरविकास खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. हमीपत्र मिळून जाईल. ही योजना पूर्ण होणे शहरासाठी आवश्यक आहे. मनपाकडे आता पुरेसा निधी नाही. कर्ज मंजूर होताच कामाची गती वाढेल आणि पूर्ण होईल.'' गंगाधरदुलंगे, मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंता
बातम्या आणखी आहेत...