आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढा कामगारांचा- १३ पैशांची वाढ घेणाऱ्या कामगारांनी मंगळवारी पुन्हा आंदोलन सुरू केले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मनसेप्रणित यंत्रमाग कामगार संघटनेच्या नेतृत्वात १० दिवस आंदोलन करून १३ पैशांची वाढ घेणाऱ्या कामगारांनी मंगळवारी पुन्हा आंदोलन केले. किमान वेतन मिळाल्याशिवाय काम करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अक्कलकोट रस्ता औद्योगिक वसाहत आणि गांधी नगरात त्यांचा जमाव जमला. परंतु मनसे संघटना त्यांच्यासाठी धावून आली नाही. यंत्रमाग कामगार कृती समितीचे नेते आले. त्यांनी २० मे रोजी मुंबईत होणाऱ्या विशाल धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
मनसे कामगार संघटनेने मेपासून आंदोलन करून सोमवारी १३ पैशांची वाढ स्वीकारली. लाल बावटा, कामगार सेना आणि इतर संघटनांच्या संयुक्त कृती समितीने मात्र वाढ अमान्य केली. त्यावरून कामगारांत फूट पडली. मनसेच्या झेंड्याखाली एकत्र आलेले कामगार मंगळवारी कृती समितीच्या नेतृत्वात एक झाल्याचे दिसून आले. कृती समितीचे नेते विष्णू कारमपुरी, व्यंकटेश कोंगारी, प्रभाकर तेलंग, विजय म्हैसूर, विजय अलकट्टी यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर निर्णायक लढा देण्याचे आवाहन केले. आंदाेलनामुळे मंगळवारी यंत्रमागवरचे उत्पादन बंद होते.

पुढे काय होणार...?
राज्यशासनाने २९ जानेवारी २०१५ रोजी यंत्रमाग कामगारांना ११ हजार १७३ रुपयांचे किमान वेतन देण्याची अधिसूचना काढली. त्याच्या विरोधात यंत्रमागधारक संघाने मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले. कामगारांना ‘पीसरेट’ (नगनिहाय)वर मजुरी देण्यात येते. महागाईच्या निर्देशांकानुसार दरवर्षी त्यात वाढ करण्यात येते. १९८८ पासून हीच पद्धत अवलंबली. किमान वेतन देणे कारखानदारांना परवडणारे नाही, असे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे किमान वेतनाची बाब आता न्यायप्रविष्ठ झाली आहे.
काय घडले अचानक?
मनसेकामगार संघटनेने शंभर कार्डमागे फक्त १३ पैशांची वाढ मान्य केली. ही वाढ आंदोलन करता दरवर्षी मिळत असते. पण मनसेने किमान वेतन मिळवून देण्याचे वचन देत कामगारांना १२ दिवस आंदोलनात गुंतवून ठेवले. सोमवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मनसेच्या नेत्यांचे मन वळवलेे. परंतु संयुक्त कृती समितीने वाढ अमान्य करून आझाद मैदानावर २० मे रोजी विशाल धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यांच्या भूमिकेशी सहमत होत कामगारांनी मंगळवारी पुन्हा ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले.
श्रेय लाटण्याचे राजकारण
मनसे कामगार संघटनेने तब्बल दहा दिवस उग्र आंदोलन करून कामगारांना वेतनवाढ मिळवून दिली. पालकमंत्र्यांनी किमान वेतन मिळवून देण्याचा शब्द दिला. त्यांचा मान राखून आम्ही तात्पुरती माघार घेतली. परंतु यापुढेही किमान वेतनासाठी आमचा लढा सुरूच राहील. विरोधक मात्र श्रेय लाटण्यासाठी कामगारांना हाताशी धरले. वर्षानुवर्षे कामगारांचे नेतृत्व करूनही किमान वेतन का मिळवून दिले नाही?
सोमशेखर पासकंटी, मनसेप्रणित यंत्रमाग कामगार संघटना सचिव