आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८४ व्या वर्षी घेतले एमएससीआयटीचे प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शिकण्या लावयाचे बंधन नसते, असे शाळेतील फलकांवर, सुविचारांच्या पुस्तकांत, वृत्तपत्रातून, बोलण्यातून वापरणे, सांगणे सोपे; मात्र त्याला जीवनात उतरवणे तितकेसे सोपे नाही. मात्र, ८५ वर्षांच्या अॅड. रामसिंग राजपूत यांनी ते प्रत्यक्ष आचरणात आणून तरुणाईला नवी प्रेरणा दिली आहे. घरातील बिकट परिस्थितीमुळे सातवीपासून शिक्षण सोडणाऱ्या रामसिंग राजपूत यांनी ६० व्या वर्षी एलएलबी तर ८४ व्या वर्षी एमएससीआयटीचे शिक्षण पूर्ण केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना आपले जीवन अर्पण करणाऱ्या अॅड. रामसिंग राजपुतांना ओळखत नाही, असा व्यक्ती जिल्ह्यात सापडणे मुश्कील आहे. अकोल्यातील तारफैलमध्ये राहणाऱ्या रामसिंग यांचा १९३० मध्ये जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची अन् त्यातच एक वर्षाचे असताना आईचे छत्र हरवले. केळीवेळीला आत्याकडे राहून शिक्षण घेणाऱ्या रामसिंगांचे वडीलही चौथीत असताना निधन पावले. कसेबसे सातवीपर्यंत पोहोचलेल्या रामसिंगांना शेतीच्या नापिकीमुळे शिक्षण सोडावे लागले. आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी कामधंदा शोधावा लागला. त्याच वेळी १९४२ मध्ये त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. समाजवादी चळवळीशी जुळलेल्या रामसिंगांनी साने गुरुजींच्या साधना मासिकाच्या विक्रीतून अर्थाजनास प्रारंभ केला. वयाच्या २० व्या वर्षी त्यांच्या गुणवत्तेमुळे त्यांना अकोल्यातील चोहोट्टा बाजारमधील न्याय पंचायतमध्ये नोकरी मिळाली. त्यामुळे आर्थिक घडी नीट होताच त्यांच्यातील विद्यार्थी अस्वस्थ झाला. १९६० मध्ये त्यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर तेल्हारा तालुक्यातील मनब्दा येथे ग्रामसहायकाची नोकरी मिळाली. त्यांच्या चिकाटी अन् मेहनतीमुळे त्या वेळी मनब्दा राज्यभरात आदर्श ग्राम ठरले. हा पुरस्कार वितरणाचा सोहळा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी यवतमाळला आयोजित केला होता. त्या सोहळ्यात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या हस्ते गावचे सरपंच पंत यांच्यासह रामसिंह राजपूत यांना पुरस्कृत केले होते. त्यानंतर शासनाने त्यांना नागपूरजवळच्या पारसा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाला पाठवले. त्यादरम्यान त्यांनी नागपूरला प्रि युनिव्हर्सिटीची सोय नसल्याने नजीकच्या बालाघाटला जाऊन भोपाळ बोर्डातून दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण केले.
वयाच्या ४६ व्या वर्षी घेतली पदवी
वयाच्या ४६ व्या वर्षी पदवी पूर्ण केली. एवढेच नव्हे तर आपल्या सामाजिक व्यस्त जीवनातून वेळ काढत वयाच्या ६० व्या वर्षी एलएलबी अन् ७९ व्या वर्षी नॅचरोपॅथी डिप्लोमा इन योगा पूर्ण केला. मागच्याच वर्षी संगणकाचे युग पाहता एमएससीआयटीची परीक्षा उत्तीर्ण केली.
रामसिंगजी अन् किस्से
अॅड.रामसिंग राजपूत हे व्यक्तिमत्त्व जिल्हाभरात सच्चा समाजसेवक म्हणून परिचित आहे. त्यांच्या आयुष्यात डोकावल्यास अनेक अविस्मरणीय प्रसंगांचा साठा सापडतो. त्यांपैकी काही किस्से त्यांचे सहकारी आनंदाने सांगतात. आदर्श ग्राम पुरस्कार पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडून स्वीकारताना पंडित नेहरू यांनी रामसिंग आणि मी एकच आहे, असे म्हणत दोघांच्या डोक्यातील टोपीकडे इशारा केला होता. तसेच रामसिंगजी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तत्कालीन वकील मंडळी एखाद्या अशिलाकडे पैसा नसल्यास ‘टोपीवाल्या वकिलाकडे जा’, असा सल्ला देत होती. कारण रामसिंगजी समाजसेवक असल्याने मोबदला घेत नव्हते. तर, योगा अँड नॅचरोपॅथीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी २० लोकांना त्या विषयात तयार केले.
बातम्या आणखी आहेत...