आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदाधिकारी निवडीचा वाद, संपर्कप्रमुख बानगुडेंच्या पुतळ्याची शिवसैनिकांनीच काढली धिंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - पदाधिकारी निवडीत जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करत शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी पक्षाचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढत त्याचे दहन केले. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांविराेधात पाेलिसात तक्रार देण्यात अाली.

जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी निवडीत संपर्कप्रमुख बानगुडे पाटील यांनी दुजाभाव केल्याचा अाराेप शिवसेनेचे मिरज तालुकाप्रमुख रवींद्र नाईक यांनी केला होता. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून सत्तेसाठी बाहेरून पक्षात आलेल्या नेत्यांच्या बगलबच्च्यांना पदाधिकारी निवडीत संधी दिल्याचा या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. बुधवारी बानगुडे पाटील हे सांगलीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची मिरजेत काही शिवसैनिकांनी धिंड काढली. शिवसेनेच्या दुस-या गटाने याप्रकरणी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी यांचा निषेध केला. यानंतर रवींद्र नाईक यांच्याविरोधात मिरजेत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळ वाद मानधनावरून?
शिवचरित्रावर व्याख्यान देण्याचा नितीन बानगुडे पाटील यांचा मूळचा पिंड आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांना लगेचच सांगली जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद देण्यात आले. शिवसेनेच्याच एका कार्यकर्त्याने शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानासाठी बानगुडे पाटील यांनी ५० हजार रुपयांचे मानधन घेतले, याचा राग या कार्यकर्त्यांच्या मनात होता. आजच्या वादामागे हेच मूळ कारण असल्याचे बोलले जाते.

मी सर्वांना पुरून उरेन
‘शिवसेनेत पदाधिकारी निवडीचे अधिकार संपर्कप्रमुखाला नाहीत. कार्यकर्त्याच्या कामाची नोंद शिवसेना भवनातूनच घेतली जाते. त्यामुळे मिरजेत झालेल्या प्रकाराची मला दखल घेण्याची गरज नाही. त्यांच्या कृत्याची पक्षाकडूनच दखल घेतली जाईल. मी इथे पक्ष वाढवायला आलो आहे आणि मला कोणी घालवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना मी पुरून उरेन.’
नितीन बानगुडे पाटील, संपर्कप्रमुख