आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agricultural Produce Market Committee Chairman Change In Solapur

वाघ कधी पाठीमागून वार करत नाही... बाजार समिती सभापती शिवदारे यांनी केले मन मोकळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - संचालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळेच अविश्वास ठराव आणला गेला. त्यांचे नेतृत्व वाघ असेल तर वाघ कधीच पाठीमागून वार करत नाही. समोरून करतो. अविश्वास ठराव आणण्यापेक्षा नेतृत्वाने राजीनामा मागितला असता तर एका मिनिटांत दिला असता, अशा भावना कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते सभापती राजशेखर शिवदारे यांनी व्यक्त केल्या.

सभापतिपदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनातील अस्वस्थता बोलून दाखवली. माजी आमदार दिलीप माने आणि विश्वनाथ चाकोते यांचे नाव घेता, त्यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले. मध्यस्थी करण्यात कमी पडले म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

एका प्रामाणिक कार्यकर्त्याची शिंदे यांनी गोची केली. त्यामुळे पुढची संघटना कशी बांधायची याचा विचार शिंदे यांनी करावा, असेही ते बोलून गेले. संचालकांच्या अपेक्षा काय आहेत, हे सांगण्यास श्री. शिवदारे यांनी नकार दिला. परंतु सभापतिपदाच्या सहा महिन्यांच्या कालावधीत विकासाचे मुद्दे हाताळले. त्यासाठी सर्वांना विश्वासात घेतले. त्यांच्याशी चर्चा केली. असे असताना १३ संचालकांनी अविश्वास दाखवला, याचेच दु:ख वाटत असल्याच्या भावना राजशेखर शिवदारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

दोन माजी आमदारांना शिवदारेंची उत्तरे...

१.विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट मतदारसंघातून तिकीट मागितले. तो माझा अधिकारच होता. भीमराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्याचीच चर्चा झाली. माने यांना पाडण्याची बैठक नव्हती. माने शहरात कमी पडले. त्यांच्या पराभवाला मी कारण असेन तर मी खूप मोठा झालो असेच म्हणावे लागेल.

२. सहकारी बँकेच्या संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांना कर्जे घेता वा देता येत नाहीत. माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी कर्जे घेऊन थकवले. ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार थकबाकीदार सभासदालाही मतदानाचा अधिकार नाही. संचालकपद तर सोडाच. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्यांचे संचालकपद रद्द झाले. तसे झाले नसते तर बँकेची शाखा बंद झाली असती.

दादांच्या पुतळ्याचे अनावरण राहिले...

बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेला ब्रह्मदेवदादा माने यांच्या पुतळ्याचे अनावरण माझ्या सभापती कार्यकाळात झाले असते तर समाधान वाटले असते. तेवढे राहून गेल्याची खंत वाटते. राजशेखर शिवदारे, मावळते सभापती