सोलापूर- हैदराबाद रस्त्यावर विस्तीर्ण पसरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराला केवळ दोनच प्रवेशद्वारे आहेत. चोरी रोखण्यासाठी दक्षिणेकडील प्रवेश बंद करण्यात आले. तरीही संरक्षक भिंतीवरून दिवसाढवळ्या चोऱ्या होतच असतात. तिथे सुरक्षारक्षक आवश्यक आहे. परंतु समितीने प्रवेशद्वारच बंद करून जडवाहतुकीला वेठीस धरले आहे. त्याचा ताण हैदराबाद महामार्गावर पडला. तिथे दररोज वाहतुकीची कोंडी होते. आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून येणारे मालट्रक या रस्त्यावर मोठ्या संख्येने उभे राहतात. त्यामुळे परिसरातून येणाऱ्या नागरिकांना रोज वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. यावर बाजार समितीनेच उपाय करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी नोंदवले.
सकाळी सहा ते सायंकाळी सातपर्यंत शहरात जडवाहतुकीला मनाई आहे. दुपारी दीड ते साडेतीनपर्यंत मनाई शिथिल करण्यात येते. त्यामुळे हैदराबाद महामार्ग ते पुणे-मुंबई महामार्गावर जडवाहतूक खोळंबलेली असते. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत वाहने येऊ शकतात. आवारात फिरून बाहेर पडण्यासाठी बोरामणी नाका येथील प्रवेशद्वार आहे. परंतु तो जडवाहतुकीच्या मनाई क्षेत्रात मोडतो. त्यामुळे तिकडून बाहेर पडणे कठीण होते. परिणामी बहुतांश ट्रक पुन्हा मुख्य प्रवेशद्वारातूनच बाहेर येत असतात. दक्षिणकडे पुण्या-मुंबईला जाणारा महामार्ग आहे. त्याच्या उड्डाण पूलावरच जडवाहनांच्या रांगा असतात. दुपारी शिथिल होणाऱ्या कालावधीत त्यांची वाहतूक सुरू होते. त्यानंतर हैदराबाद रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. ती फोडण्यासाठी बाजार समितीतून येणारे ट्रक दक्षिण दिशेतूनच बाहेर पडणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नाही. दक्षिण दिशेकडे दोन प्रवेशद्वारे आहेत. ते दोनही मार्ग सुरू केल्यास आवारत येणारी वाहने या मार्गांनी बाहेर पडतील. परंतु समितीने दोन्ही मार्ग बंद करून वाहतुकीची कोंडी केली.
बाजार समितीला संरक्षक भिंत असूनही दिवसाढवळ्या मालाची चोरी होताना दिसते.
समितीच्या आवारात आलेला शेतमाल असा रस्त्यावरच उतरवला जातो आणि तिथेच लिलाव करण्यात येतो. त्यामुळे रस्ता बंद होतो.
प्रश्न : बाजारसमिती आवारातील दक्षिणेकडील मार्ग बंद झाल्याने हैदराबाद रस्त्यावर नित्य वाहतुकीची कोंडी होते.
शिवदारे: कायकरणार? मागील गेटवर रोज चो-या होतात. शेतक-यांचा कांदा चोरून नेताना व्यापा-यांनी अनेकदा पकडले. पोलिसांना सांगितले. शेवटी प्रवेशमार्ग बंद करून 14 फूट उंच सिमेंट काँक्रिटने भिंत बांधली.
प्रश्न: मार्गसुरू करून सुरक्षारक्षक नियुक्त केले. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर..?
शिवदारे: कुठेकुठे म्हणून सुरक्षारक्षक बसवणार? सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. ते कार्यान्वित झाल्यानंतर बाहेरच्या मार्गाचे पाहता येईल.
राजशेखर शिवदारे, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती