आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akaluj's Altaf Come Second Across The Country In Performing Arts

अकलूजचा अल्ताफ अभिनय व नृत्य विषयात देशात आला दुसरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अभिनय व नृत्य या विषयाच्या नॅशनल इलिजीबिलिटी टेस्ट या परीक्षेत अकलूजचा अल्ताफ अमीन मुलाणी याने भारतात अभिनय व नृत्य सादरीकरणाच्या सर्व शास्त्रात द्वितीय येण्याचा बहुमान मिळवला आहे. यूजीसीने डिसेंबरमध्ये घेतलेल्या नेट परीक्षेत त्याने परफॉर्मिंग आर्ट्स या विषयावर विशेष अभ्यास केला होता. अकलूजसारख्या गावातून अभिनयाची यात्रा करण्यासाठी निघालेल्या 30 वर्षांच्या अल्ताफने नाट्यकलेच्या प्रवासाला अकलूजच्या युवा महोत्सवातून सुरुवात केली. पुढे मुंबई विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवीही त्याने संपादित के ली आहे. देशातील सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांतून द्वितीय येण्याचा मान अकलूजच्या अल्ताफला मिळालेला आहे. या परीक्षेत त्याने देशपातळीवरील सर्व नाट्यशास्त्राशी निगडित असलेल्या साहित्याचा अभ्यास केलेला आहे.


काय आहे परफॉर्मिंग आर्ट्स?
नृत्य अभिनय, संगीत, संहिता इत्यादी लेखन, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, देहबोली, संवादफेक अशा नाटकाच्या प्रत्येक घटकांचा अभ्यास यात केला जातो. या विषयांचे तीन पेपर असतात. त्यात त्याने अव्वल गुण संपादन केले आहेत.


रंगभूमीने केले समृद्ध
मुंबई विद्यापीठात नाट्यशास्त्राचा अभ्यास करत असताना अल्ताफने गाजलेल्या नाटकांत भूमिका केल्या आहेत. त्याचा उपयोग त्याला अभ्यास क रताना झाला. विविध ठिकाणचे महोत्सव व नाट्य स्पर्धा, मालिका, चित्रपट यात भूमिका करत त्याने करिअर सुरू केले होते.


पुस्तकांनाच मानले गुरू
देश परदेशातील विविध प्रकारच्या नाट्य प्रकाराच्या साहित्याचा अभ्यास करून त्यांने पुस्तकांनाच आपले गुरू मानले. छोट्यशा गावात ना कुणी मार्गदर्शक ना कुणी वाट दाखवणारे शिक्षक.


25 हजारांची शिष्यवृत्ती
अल्ताफला या परीक्षेत अव्वल येण्याच्या मोबदल्यात सरकाचा मदतीचा हात मिळाला आहे यूजीसीच्या या ज्युनिअर फेलोशीप परीक्षेत अव्वल येणार्‍यांना महिन्याकाठी किमान 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते. त्या नियमाप्रमाणेच त्याला आता कोणत्याही संशोधनासाठी महिन्याकाठी तब्बल 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.


या लेखकांचा केला अभ्यास
भारतातील गिरीश कर्नाड, वामन केंद्रे, शफात खान, रतन ठियाम, स्वदेश दीपक, बंगालचे शंभू मित्र यांचा तर परदेशातील ऑर्थर मिलर, हेरॉल्ड पिंटर, श्ॉम्युअल बकेट, शेक्सपीयर, अँन्टॉन चेकाव, मेर होल्ड, स्टॅनिस्लॉवेस्की, ग्रीक नाटककार सोफोक्लीज आदी दिग्गज नाट्य अभ्यासकांच्या साहित्याचा अल्ताफने बारकाव्याने अभ्यास केला आहे.


पहिले यायचे होते
मी परफॉर्मिंग आर्ट या विषयात दुसरा आलो आहे. परंतु, मला पहिला क्रमांक पटकावण्याची इच्छा होती. या यशासाठी मी खूप कष्ट केले आहेत. अनेक वाईट दिवस काढले; पण आता या रूपाने आशेचा किरण आयुष्यात आला आहे.’’ अल्ताफ अमीन मुलाणी