आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरेगावात उभारणार नाट्य विद्यापीठ- संजय देवतळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- मुंबईच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत बॉलीवूड म्युझियम आणि गोरेगाव येथे चित्रपट विद्यापीठ उभारण्यात येत आहे. तेथेच नाट्य विद्यापीठ उभारणार असून ते जगातील एकमेव विद्यापीठ असेल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी शनिवारी येथे दिली.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 94 व्या संमेलनाचे उद्घाटन सकाळी झाले. त्या वेळी ते बोलत होते. रत्नागिरी येथे झालेल्या संमेलनात यशवंत नाट्य मंदिरासाठी शासनाने 5 कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली होती. परंतु, ते अद्याप मिळाले नाहीत, अशी खंत परिषदेचे अध्यक्ष जोशी यांनी व्यक्त केली होती. परंतु श्री. देवतळे यांनी याच संमेलनाच्या मंचावर 5 कोटींपैकी 3 कोटी 75 लाख रुपयांचा धनादेश श्री. जोशी यांच्याकडे सुपूर्द करून रंगकर्मींना आश्चर्याचा धक्का दिला. शिवाय संमेलन झाल्यानंतर पाठपुरावा करून मिळणारी रक्कमही याच वेळी देऊन टाकली.

शासन कलावंतांच्या पाठीशी असल्याचे सांगत श्री. देवतळे पुढे म्हणाले, ‘‘नाट्यप्रयोग आणि चित्रपटांना अनुदान देण्याबाबत शासनाने सुधारित धोरण घेतले. त्यामुळे या पुढे नाटकांचा दर्जा पाहून अनुदान देणार आहोत. ‘अ’ वर्गातील नाटकांना 25 हजार तर ‘ब’ वर्गातील नाटकांना 20 हजार रुपयांचे अनुदान मिळेल.’’

अरे, नुसते पैसे मागता, अण्णा भाऊंचे नाव घ्या!
नाट्य परिषदेच्या भविष्यातील कामांचा आढावा श्री. जोशी यांनी घेतला. त्यासाठी पैसा आणि जमिनीची मागणी केली. त्यांचे हे भाषण सुरू असतानाच दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष दिलीप देवकुळे प्रेक्षकांच्या समोरील रांगेतून उठले. म्हणाले, ‘‘अरे, नुसतेच पैसे मागता. शाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव घ्या. विठाभाऊ मांग, प्रल्हाद शिंदे ही कलावंत मंडळी या पंढरपूरची आहेत. त्यांच्या सन्मानासाठी मंचांना नावे दिली नाहीत. निदान नावे तरी घ्या.!’’ त्यांच्या या वक्तव्यावर श्री. जोशी एवढेच उत्तरले, ‘‘अण्णा भाऊ मोठी व्यक्ती. मी फार छोटा आहे.’’

प्रशिक्षण संस्थेस 5 एकर द्या.!
रंगभूमीवर नवीन कलावंत घडवण्यासाठी परिषदेच्या वतीने प्रशिक्षण संस्था उभी करायची आहे. त्यासाठी वन विभागाने 5 एकर जमीन दिली तर हा प्रश्न सुटेल ’’ मोहन जोशी, अध्यक्ष, नाट्य परिषद, मुंबई

तालुकास्तरावर नाट्यगृह
राज्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्रालयाने जिल्हा आणि तालुकास्तरावर नाट्यगृहे उभारण्याचा निर्णय घेतला. त्याचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवला. तो मंजूर झाल्यानंतर पहिले नाट्य मंदिर पंढरीत उभारू. ’’ संजय देवतळे, सांस्कृतिक कार्यमंत्री