आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्कलकोट तालुक्यात नागरिकांची पाण्यासाठी पुन्हा वणवण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट - अक्कलकोट तालुक्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. शहराला सध्या आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो आहे. 19 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. पण, तो पुरेसा होत नसल्याने नागरिकांवर वणवण करण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय तालुक्यात बोरोटी खुर्द येथे टँकर सुरू आहे. आणखी दहा गावात टँकरची गरज भासणार आहे.

अक्कलकोट तालुका हा अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडतो. यंदा तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. ऊन वाढेल, तशी टंचाईत वाढ होत आहे. मार्चअखेर ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. शहराला सध्या पाण्याची मोठी टंचाई भासते आहे. हिळ्ळीची नादुरुस्त जलवाहिनी आणि हालचिंचोळीतील साठा संपल्याने टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ शहरावर आली. सध्या 19 टँकरद्वारे गळोरगी तलावातून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी टाकले जाते आहे. रोज साधारणपणे 70 खेपा केल्या जातात. त्यानंतर आठ दिवसांआड पाणी साठवून शहराला नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पण, तो पुरेसा होत नाही. त्यामुळे नागरिकांवर वणवण करण्याची वेळ आली आहे.

तालुक्यातही फारशी स्थिती वेगळी आहे, असे नाही. पण, पंचायत समितीने त्यादृष्टीने आराखडा आखला आहे. सध्या नळयोजना दुरुस्तीसाठी 1 वाडी, 1 वस्ती आणि 17 गावांत कामे सुरू आहेत. 7 वाड्या-वस्तीवरील विंधन विहीर दुरुस्तीची कामे चालू आहेत. संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी उपाययोजना म्हणून 47 गावे आणि 90 वाडी वस्तीवर कूपनलिका घेण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तालुक्यात 134 गावे आहेत. त्यापैकी अनेक गावात टंचाई वाढते आहे. सध्या किरनळ्ळी, नाविंदगी तांडा, बोरोटी खुर्द येथे खासगी विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय हिप्परगे, चुंगी, कुरनूर येथे खासगी विहीर अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच 19 गावे व 4 वाड्या-वस्त्यांवर विहीर अधिग्रहण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. टंचाईग्रस्त तीन गावांत विहीर अधिग्रहण करण्यात आली असून, आणखी चार ठिकाणचे प्रस्तावही तयार करण्यात आले आहेत.

दहा गावांना टँकरची गरज भासणार
बादोले, सुलेरजवळगा, हंजगी, वसंतराव नाईक तांडा, दुधनी, कडबगाव, डिग्गेवाडी, शिरसी, अरळी या गावात पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे. या गावांमध्ये टँकरची मागणी होत आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू आहे. तसेच विहिरीच्या अधिग्रहणाचे प्रस्ताव तयार आहेत.
पाणीटंचाईबद्दल व्यापारी आक्रमक
अक्कलकोट शहराला अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरूआहे. हिळ्ळी बंधा-यात पाणी असूनही नियोजनाअभावी अक्कलकोट शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा अक्कलकोट व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. मुख्याधिका-यांनाही यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे. योग्य नियोजन केल्यास रोज पाणी मिळेल. पण नियोजनाअभावीच ही वेळ आली आहे, असेही संघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे यांनी सांगितले. साखरे यांच्यासह सचिव प्रशांत केसकर, खजिनदार राजशेखर सोड्डे, उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते आदींनी पालिकेत प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.
४मार्चअखेर पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. संबंधित गावांनी त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
विमल गव्हाणे, सभापती, पंचायत समिती,
पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी पूरक उपाययोजना करण्यात येत आहेत. टँकर चालू करणे, विहीर अधिग्रहण, कूपनलिका घेणे यासह आवश्यक त्या उपाययोजनेसंदर्भात जिल्हा परिषदेकडे आराखडा सादर केला आहे.
रंजना कांबळे, प्रभारी गटविकास अधिकारी,