आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलमट्टीच्या पाण्याची शहराला प्रतीक्षा; जिल्हाधिकारीही जाणार कर्नाटक भेटीला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहराला पाणीपुरवठा करणार्‍या औज बंधार्‍यात सोमवारी सायंकाळी 3.45 मीटर पाणीसाठा होता. तो येत्या मार्चअखेरपर्यंत पुरणार आहे. त्यानंतर मात्र आलमट्टी धरणाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. ते पाणी मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी कर्नाटकात जाणार आहेत.

असे आहे नियोजन
शहरासाठी उजनी धरणात 24 टीएमसी (हजार दशलक्ष घनफूट) पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला होता. त्यापैकी चार टीएमसी नोव्हेंबर 2012 मध्ये सोडण्यात आले. 3 जानेवारीला साडेचार टीएमसी सोडण्यात आले. 1 मार्चला साडेचार टीएमसी, 1 मे रोजी पाच टीएमसी, 1 जुलैला पाच टीएमसी पाणी सोडण्याचे पुढील नियोजन आहे. पण उजनीतील पाणीपातळी वजामध्ये गेल्यामुळे नदीद्वारे सोलापूर शहराला पाणी सोडणे अशक्य दिसू लगाले आहे.

आलमट्टीतून दोन टीएमसी
शहरासाठी दोन टीएमसी पाणी पुरेसे असल्याने ते कर्नाटकच्या आलमट्टी धरणातून घ्यावे, म्हणजे शहरासाठी उजनी धरणातून 15 टीएमसी पाणी सोडावे लागणार नाही, असा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारला आलमट्टी धरणातून दोन टीएमसी पाणी सोलापूर शहरासाठी देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. कर्नाटकला कोल्हापूर येथील दूधगंगा धरणातून दोन टीएमसी पाणी दिले जाणार आहे.

15ला शिष्टमंडळ जाणार
पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, राज्य सरकारातील अधिकारी व सोलापूर जिल्ह्याधिकारी यांचे एक शिष्टमंडळ या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी 15 फेब्रुवारीला कर्नाटक दौर्‍यावर जाणार आहे. कर्नाटक सरकारला ते विनंती करणार आहे. आलमट्टीतून दोन टीएमसी पाणी मिळाल्यास उजनीतील पाणीसाठा भविष्यासाठी राखीव राहणार आहे. येत्या पावसाळ्यात जर पावसाने ओढ दिल्यास उजनीतील शिल्लक पाणीसाठा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आलमट्टीचे पाणी मिळवण्यासाठी शिष्टमंडळाला पराकाष्ठा करावी लागणार आहे. अन्यथा जून-जुलैमध्ये दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.