आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलो रे बोलो, जयभीम बोलो! दिवसभर भीम अनुयायांची अभिवादनासाठी रीघ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यहाँ भी बाबा, वहाँ भी बाबा, जहाँ भी देखो बाबा ही बाबा..., एकच साहेब बाबासाहेब..., बोलो रे बोलो जयभीम बोलो... अशा जयघोषात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती उत्सवाला मंगळवारी प्रारंभ झाला. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या डाॅ. आंबेडकर चौकात अभिवादनासाठी दिवसभर भीमप्रेमींची रीघ लागली होती.
सोमवारी मध्यरात्रीनंतर आंबेडकर चौकातील पुतळ्यासमोर मेणबत्ती आणि अगरबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून लोकांची गर्दी वाढली. समता सैनिक दलाने संचलन करून मानवंदना िदली. यानंतर दिवसभर भीमप्रेमी, विविध पक्षांची नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आदींनी उपस्थिती लावून अभिवादन केले.

अभिवादन करणाऱ्यांमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर सुशीला अाबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, महापालिका सहाय्यक आयुक्त अमिता दगडे पाटील, महापालिका पक्षनेते संजय हेमगड्डी, नगरसचिव ए. ए. पठाण, प्रदेश काँग्रेसचे सुधीर खरटमल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोहर सपाटे, अरुणा वर्मा, विनायक विटकर, माजी आमदार निर्मला ठोकळ, माजी महापौर नलिनी चंदेले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मनीषा फुले, राजा सरवदे, राजा इंगळे, आनंद चंदनशिवे, रवी गायकवाड, बबलू गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, अॅड. संजीव सदाफुले, अशोक जानराव, अरुण भालेराव, दशरथ कसबे, माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर आदींसह अनेकजण उपस्थित होते.

विविध भागात स्टाॅल्स
जयंतीनिमित्तआंबेडकर चौक, बुधवार पेठ येथील आंबेडकर उद्यान, अस्थिविहार या ठिकाणी विविध स्टॉल लागले होते. या स्टॉलमध्ये बाबासाहेबांच्या छायाचित्रांचे स्टीकर्स, पेन, लॉकेट, अंगठी, हातातील दोरा, निळा रंग, मेणबत्ती, अगरबत्ती आदी साहित्य होते.

अशोकचक्र, संविधान स्तंभाचे उद्घाटन
शिवाजीचौक येथील सम्राट चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर राजा सरवदे यांच्या वतीने अशोक चक्र आणि संविधान प्रास्ताविकाच्या स्तंभाचे उद््घाटन करण्यात आले. भोवती लहान चबुतराही तयार करण्यात आला.

पहिल्यांदाच भरवली जत्रा
कुमठानाका येथील बोधीसत्व पुरस्कार विजेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाने यंदा प्रथमच जयंतीनिमित्त जत्रा भरवली. सकाळी कुमठा नाका परिसरातून महिलांची रॅली काढण्यात आली. परिसरातील प्रत्येक घरावर निळा झेंडा आणि फुगे लावण्यात आले होते. यानंतर सायंकाळी कुमठा नाका संजय नगर येथे जत्रा भरवण्यात आली. चिमुकल्यांचे मनोरंजन व्हावे याकरिता जत्रेत घोडे, उंट, पाळणा आदी होते. पहिल्यांदाच भरवलेल्या जत्रेत हजारो भीमसैनिकांनी उपस्थिती लावली. लहान मुलांनी उंटावर स्वार होऊन आनंद लुटला. यानंतर सहभागी सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डाॅ. आंबेडकर चौकातील पुतळ्यासमोर अभिवादनासाठी मध्यरात्रीपासूनच भीमप्रेमी येऊ लागले. मंगळवारी सकाळी या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.