आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणातून केवळ प्रस्थापित नेते घडले- आनंदराज आंबेडकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- राजकीय आरक्षणाचा दलितांच्या विकासासाठी म्हणावा तसा उपयोग झाला नाही. दलितांमधून नवे प्रस्थापित नेते तयार झाले, अशी टीका करीत राजकीय आरक्षणाची गरजच नाही, असे सांगत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्तीच्या जगण्याचा हक्क शाबूत राहिला पाहिजे, अशी भूमिका रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी मांडली.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात गुरुवारी सकाळी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी दलित चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सध्याची राजकीय स्थिती याविषयी आपली मते मांडली. ‘रिपब्लिकन सेना’ ही सामाजिक चळवळ आहे. त्यामुळे राजकीय पटलावर येण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या जनतेमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. जागृती करणे हाच माझा प्राधान्यक्रम आहे. त्या हेतूने गाव तेथे रिपब्लिकन सेना नेणे याला मी महत्त्व देत आहे. राज ठाकरे हे जिल्ह्याच्या एका ठिकाणी गर्दी करून सभा घेतात, त्यातून लोकांचे प्रश्‍न, त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करता येत नाही. त्यामुळेच मी गावोगावी जाऊन लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो आहे. गर्दीच्या सभा आम्हालाही घेता येतील. पण, त्यातून साध्य काहीच होत नाही. निवडणुकांमधील राजकीय आरक्षण हे केवळ काही प्रस्थापित नेत्यांसाठीच राहिले आहे. आरक्षणाच्या जागेवर निवडून जाऊन हे दलित लोकप्रतिनिधी आपापल्या पक्षाचाच अजेंडा राबवितात. त्यातून दलितांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होते, असे आंबेडकर यांनी सांगितले.

21 व्या शतकाच्या सुरुवातीला इंदू मिलचे आंदोलन झाले, ही चांगली सुरुवात आहे. 24 दिवस चाललेल्या या आंदोलनात खरी एकजूट दिसली. कार्यकर्ते एकत्र आले. सध्याची राज्यातील दुष्काळाची परिस्थिती दयनीय आहे. महाराष्ट्र सरकारचे धोरण व नियोजन चुकीचे आहे. राजकीय समानता एक व्यक्ती एक मताने मिळाली. पण, सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे गरजेचे आहे. याला तडा गेला तर तोडफोड होईल. सरकारने भांडवलशाही व्यवस्थेकडे पाहण्यापेक्षा सामान्याच्या हिताकडे लक्ष देऊन सत्ता राबवावी. तरच हा देश महासत्ता बनेल, असेही आंबेडकर म्हणाले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज व्हटकर यांनी स्वागत केले.नेत्यांमुळेच ही वेळ आली..
मराठा आरक्षणाची तशी गरज नाही. पण, गेल्या काही वर्षात मराठा समाजातील नेत्यांनी स्वत:भोवतीच सत्तेचे समीकरण ठेवले. त्यामुळे आज मराठा समाजालाही आरक्षण मागावे लागत आहे. आरक्षण हे गरजवंतांना मिळावं हेही तितकेच सत्य. ज्या शाहू महाराजांनी दलितांच्या विकासासाठी आरक्षण आणले, त्याच शाहू महाराजांच्या समाजाला आज आरक्षणाची गरज भासावी, हे या समाजातील आजच्या नेत्यांच्या राजकारणाचाच परिणाम आहे, अशी खरमरीत टीका आंबेडकर यांनी केली.


किल्ल्यांची दुर्दशा रोखा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरू मानले, तर फुले यांनी पहिल्यांदा शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. शिवाजी महाराजांबद्दल त्यांना आदर होता. त्या शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक व्हावे, ही आमचीही इच्छा आहे. पण, ज्या शिवरायांनी महाराष्ट्राची निर्मिती केली, त्यांच्या गडकोट किल्ल्यांची दुर्दशा होत आहे. राज्यकर्त्यांनी ती पहिल्यांदा रोखावी, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

एकमेव नेते शरद पवार
सध्या जनतेच्या जवळ असलेले नेते राहिलेले नाहीत. जनतेची नाडी ओळखणारा, लोकांचे प्रश्‍न माहिती असलेला एकमेव नेता महाराष्ट्रात आहे, तो म्हणजे शरद पवार, असे मत आनंदराज आंबेडकर यांनी नोंदले.