आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Andhra Government Sent To Helicoptor For Accident Hit People

अपघातग्रस्तांसाठी आंध्र सरकारने पाठवले विमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले सरकार कसे असावे, याचा विचार केला तर खूप व्याख्या करता येतील. मात्र, आंध्र प्रदेश सरकारने गेल्या मंगळवारी शिर्डीहून परतणा-या आरामबसला झालेल्या अपघातानंतर आंध्रातील लोकांची सेवा करून जो आदर्श घालून दिला, त्यातून कर्तव्यकठोर सरकारचा आदर्श निर्माण झाला.

शिर्डीहून पंढरपूरकडे जाणारी ही आरामबस मंगळवारी पहाटे कविट गावाजवळ पुलावरून कोसळली. या भीषण अपघातात ८ जण जागीच ठार झाले. १३ प्रवासी गंभीर जखमी झाले. यात कुणीही व्हीआयपी नव्हते, ना कोणी राजकीय लोक. अपघाताचे वृत्त आंध्र प्रदेशात धडकले आणि राज्य प्रशासन तातडीने सक्रिय झाले. क्षणाचाही वेळ न दवडता राज्य सरकारने सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून अपघाताची माहिती मिळवली. नेमका अपघात कुठे झाला, जीवितहानी झाली का, जखमी किती आहे, तातडीच्या उपचारांची कुणाकुणाला गरज आहे, ही माहिती मिळवून सरकारने छत्तीसगडमधील रायगड येथून विशेष विमानाची व्यवस्था केली.

दिवस उजाडल्यावर दुपारी १२.४५ वाजता निघालेले हे विमान २.२५ वाजता सोलापूर विमानतळावर उतरले. शिस्तबद्ध पद्धतीने जखमींना विजयवाडा येथे नेण्यात आले. मृतदेहांवर करमाळा येथील रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर हे मृतदेह चार रुग्णवाहिकांमध्ये हैदराबादला पाठवण्यात आले.

अपघात हा अपघातच असतो. अनेकांना आपले आप्तेष्ट यात गमवावे लागतात. जखमींना उपचारांची तातडीची गरज असते तेव्हा स्थानिक सरकारी रुग्णालयांत उपचार सुरू होतात. सर्वच राज्यांमध्ये अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार केले जात असले तरी आपल्या राज्याचा नागरिक म्हणून कर्तव्य बजावणारी राज्य सरकारे आणि लोकप्रतिनिधी तसे विरळाच. आंध्र प्रदेश मात्र याला अपवाद आहे. उपचारांत कुठेही कमतरता पडू नये असे आंध्रचे मंत्री व अधिकारी जखमींवर उपचार करणारे डॉ. शिवपुजे यांना वारंवार सांगत होते. जखमा नेमक्या किती गंभीर आहेत, याचीही आस्थेने विचारणा केली जात होती. यात या लोकांची अस्वस्थता जाणवत होती.

डॉ. शिवपुजे म्हणतात, "आपल्या राज्यातील लोक परराज्यात अडचणीत आहेत म्हणून एवढ्या आस्थेने चौकशी करणारे राज्य सरकार मी कधीच पाहिले नाही. मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी एवढे संवेदशील होऊन तत्परता दाखवू शकतात हे पाहून मीदेखील स्तिमित झालो.'

ही तर परंपराच...
- दोन वर्षांपूर्वी सोलापूर-उमरगा मार्गावर जळकोटजवळ आंध्र प्रदेशची एक बस पुलावरून कोसळली. ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला. १५ जखमी झाले होते. तेव्हाही आंध्र सरकारचे पथक सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात तळ ठोकून होते. यात तेथील जिल्हाधिकारी, राज्याचे आरोग्य मंत्री, संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा समावेश होता. ही परंपरा आंध्र सरकारने कायम जोपासली आहे.

हा आदर्श घ्याच...
आपल्या राज्यातील नागरिकांचा परराज्यात अपघात होतो तेव्हा संवेदशील आंध्र प्रदेश सरकार तत्परतेने आस्था दाखवते. घरातील सदस्यांसारखी वागणूक या नागरिकांना मिळते. वेळप्रसंगी विमानाचीही व्यवस्था केली जाते. हा आदर्श महाराष्ट्रानेही घ्यायला हवा. फक्त व्हीआयपींच्या सेवेसाठी तत्परता दाखवून सरकार सर्वांसाठी आहे हे सामान्यालाही जाणवलेच पाहिजे.
... जणू सारे जखमी कुटुंबातीलच
* कविट गावाजवळ अपघात झाल्याची माहिती कळल्यानंतर सरकार, मंत्री आणि प्रशासन किती संवेदनशील आहे याची साक्ष यातून मिळाली. जणू आपल्या कुटुंबातील कुणी अडचणीत असल्यागत आंध्रचे उद्योगमंत्री कोल्लू रवींद्रन, रघुनंदन राव, कृष्णा जिल्ह्याचे उपविभागीय दंडाधिकारी साईबाबू हे लोक जखमींवर उपचार करणारे डॉ. विजय शिवपुजे यांच्याशी कायम संपर्कात होते.
महाराष्ट्र कुठे?
* परराज्यात गेलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांच्या वाहनांना अनेकदा अपघात झाले. अनेकांचे आप्तेष्ट यात मृत्युमुखी पडले. परंतु महाराष्ट्र सरकारची यंत्रणा अपघातस्थळी जाऊन आपल्या नागरिकांची आस्थेने चौकशी करत असताना कुणी पाहिले नाही. त्या-त्या राज्यांनी व्यवस्था करून मदत केल्यावर हे लोक परतल्याचे दाखले आहेत.
* गेल्या वर्षी सोलापूर-विजापूर मार्गावर अशाच एका अपघातात महाराष्ट्रातील ८ जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा महाराष्ट्र सरकारची मदत तर सोडाच, साधी जखमींची चौकशी करायलाही कुणी गेले नाही. पोलिस यंत्रणा वगळता प्रशासकीय अधिकारी किंवा मंत्र्याने चौकशी केल्याचेही ऐकिवात नाही.