आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Angry Farmers Throws Tomato On Road Over Rates Sharply Drops

दर पडल्याने कुर्डुवाडीत टोमॅटो उघड्यावर टाकला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ दिवसांपूर्वी माढा तालुक्यात झालेल्या पावसामुळे कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलावात टोमॅटो प्रतिकिलो सहा रुपये दराने विकला जात आहे. दर पडल्याने शेतकर्‍यांनी टोमॅटो बाजार समितीच्या आवारातच टाकून दिला आहे. अचानक भाव कोसळल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसत आहे. मात्र, याकडे शेतकरी संघटनेचे दुर्लक्ष होत आहे. व्यापार्‍यांच्या मक्तेदारीमुळे टोमॅटोचे दर कोसळल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

15 दिवसांपूर्वी कुडरुवाडी बाजार समितीच्या लिलावमध्ये टोमॅटो प्रतिकिलो 13 ते 15 रुपये दराने विकला जात होता. परंतु गेल्या आठवडाभरामध्ये झालेल्या पावसाने त्याचे दर प्रतिकिलो पाच ते सात रुपयांवर आला आहे. दुष्काळी स्थितीत शेतकर्‍यांनी महागडे बियाणे, खते, औषधे यावर हजारो रुपयांचा खर्च करून मोठय़ा कष्टाने टोमॅटोचे उत्पादन घेतले. मात्र, त्यातून केवळ वाहतूक खर्चही मिळत नसल्याने ते बाजार समितीतून परत नेणेही परवडणारे नाही. त्यामुळे शेतकरी त्यावर खर्च करण्यापेक्षा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो टाकून देणे पसंद करीत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात अनेक ठिकाणी टोमॅटोचे ढीग पडल्याचे चित्र आहे. तालुक्यातील गावागावातून येणारा टोमॅटो भाव पडल्याने बंद झाला आहे. दरच मिळत नसेल तर कशाला आणायचे असे शेतकरी म्हणत आहेत.

उसाला दर मिळावा, यासाठी शेतकरी संघटनांकडून आंदोलन केले जाते. ऊस उत्पादनात मोठय़ा शेतकर्‍यांचाच समावेश आहे. त्यासाठी या संघटना साखर सम्राटांच्या विरोधात उभ्या ठाकतात. मात्र पालेभाज्या, फळभाज्या व फळ उत्पादक लहान शेतकर्‍यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच व्यापारी या शेतकर्‍यांची लूट करताना दिसतात. त्यामुळे शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.