सोलापूर - येथील नागेश करजगी आर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर दुधाचे पाश्चरायझेशन (तापवणे) करण्याच्या तंत्रावर शोधनिबंध सादर केला. त्यास प्रथम क्रमांक मिळाला. अमरावती येथे आयबीएसएस महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा झाली.
हिंदी चित्रपट थ्री इडियट्समध्ये आमिर खानने जिज्ञासू रँचो या विद्यार्थ्याची भूमिका केली. विज्ञान मुळातून समजून घेऊन त्याचा जीवनात वापर करण्याचे सूत्र त्यात सांगितले होते. तसाच प्रयत्न करत रवी काकी, मीरा जाडकर, वैभव ढेपे या ‘रँचों’नी नवतंत्राचा शोध घेतला आहे.
दूध अल्प काळानंतर नाशवंत होणारे आहे. ते दीर्घकाळ टिकवण्यासाठी पाश्चरायझेशन करण्याच्या पर्यायाचा शोध पाश्चात्त्य संशोधक लुई पाश्चर यांनी लावला. त्यामुळे दूध टिकण्याचा कालावधी वाढला. यात दूध सुमारे 80 अंश सेल्सिअसपर्यंत तापवणे व एकदम थंड करणे. झाले पाश्चराईज. या कामी पारंपरिक ऊर्जेचा वापर केला जातो. त्याऐवजी सौरऊर्जेचा वापर करण्याची युक्ती या विद्यार्थ्यांनी वापरली. नावीन्यपूर्ण तंत्राचा आविष्कार असल्याने साहजिकच याला प्रथम क्रमांकही मिळाला. सोलापूरच्या रँचोंचे हे यश निश्चित महत्त्वाचे आहे. आर्किडचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार, प्रा. एस. एस. मेतन, व्यंकटेश काकी आदींनी मार्गदर्शन केले.
आर्किडच्या ओंकार स्वामी, पूजा कन्ना व आकाश
गुगले यांनीही शोधनिबंध सादर केला. रॅपीड प्रोटो टायपिंग हा विषय होता. तर उमावती निकम, अंकिता डोके, अंकुश कोरे यांनी अँटोमॅटिक व्हेईकल लोकेटर विषयावर शोधनिबंध सादर केला.
अँल्युमिनियमच्या फॉइल्सचा वापर
अँल्युमिनियमच्या फॉइल्स वापरून सौरऊर्जा एका विशिष्ट बिंदूवर केंद्रित करणे, त्या बिंदूवर दूध तापवण्यासाठीचे भांडे बसवणे, असे तंत्र आहे. 70 ते 80 डिग्री तापमान मिळण्यासाठी अँल्युमिनियम छत्रीचा आकार मोठा ठेवल्यास तेवढे तापमान सहज मिळते.’’ मीरा जाडकर, आर्किड अभियांत्रिकी