आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अर्जुन’समोर ‘गोपाळा’नेही टेकले हात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अर्जुन नागरी सहकारी बँकेचा गाडा व्यवस्थित हाकण्यासाठी सारथीची भूमिका स्वीकारलेल्या गोपाळसा दर्बी यांनीही बँकेच्या प्रशासकीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे यांनी तो नामंजूर करून, थकीत कर्जदारांवर फौजदारी खटले दाखल करा; परंतु कामकाज पाहावेच लागेल, अशी सूचना केली. त्यामुळे श्री. दर्बी यांनी राजीनामा मागे घेतला. त्यांच्यासोबत सुरेश चौधरी या सदस्यानेही राजीनामा दिला होता.
कर्जवसुली होत नाही, न्यायालयीन प्रकरणांमुळे अडचणी येतात, अशा सबबी सांगून दर्बी यांनी शनिवारी (2 जून) जिल्हा उपनिबंधक मोरे यांच्याकडे राजीनामा दिला होता. महिन्यापूर्वी दर्बी यांनीच बँक वाचवण्याचे प्रयत्न करणार म्हणून हे पद स्वत:हून स्वीकारले होते. त्यामुळे मोरे यांनी त्यांचा राजीनामा नाकारला. प्रशासकीय मंडळाला संचालक मंडळाचे अधिकार असतात. त्याचा वापर करून थकीत कर्जदारांवर फौजदारी खटले दाखल करा, त्यांच्या मालमत्तेचे लिलाव करा, असे मोरे यांनी त्यांना सांगितले.
पंधरा दिवसांपूर्वी ठेवीदारांची बैठक घेऊन टप्प्याटप्प्याने रकमा देण्याचे कबूल करणा-या दर्बी यांच्या राजीनामा नाट्याने ठेवीदारांमध्ये अस्वस्थता पसरली.
सोमवारी सकाळीच बँकेत ठेवीदारांची गर्दी झाली होती. जवळपास 50 ठेवीदार बँकेत दुपारपर्यंत बसून होते. परंतु, दर्बी यांच्यासह मंडळाचे सदस्य बँकेकडे फिरकले नाहीत. त्यांचे मोबाइलही बंद होते.

तिसरे प्रशासकीय मंडळ
बँकेला आर्थिक घरघर लागल्यानंतर सहकार खात्याने पंढरपूरच्या भगीरथ भारत भालके यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली. त्यांनी दोन कोटी रुपयांचे भागभांडवल देऊन बँकेला ऊर्जितावस्था आणली. ते पाहून सहस्रार्जुन क्षत्रिय समाजातील नेते जागे झाले. समाजाची बँक ताब्यात देण्याची मागणी केली. त्यांच्या दबावामुळे माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मंडळ नियुक्त झाले. तीनच महिन्यांत त्यांनी सामूहिक राजीनामे दिले. सहकार खात्याने दर्बी यांना नियुक्त करून क्षत्रिय समाजाला आणखी एक संधी दिली. परंतु, त्यांनाही कर्जदारांनी सहकार्य केले नाही.
संचालकांचे अधिकार
प्रशासकीय मंडळाला संचालकांचेच अधिकार असतात. त्याचा वापर करून थकबाकी वसूल करून बँकेला वाचवता येणे शक्य आहे. त्यासाठी क्षत्रिय समाजाला दुस-यांदा संधी दिली. आता तिसरी संधी नाही.’’
श्रीकांत मोरे, जिल्हा उपनिबंधक