आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित रंगभूमीचा सशक्त प्रवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी रंगभूमीची पूर्व परंपरा म्हणून गोंधळ, कीर्तन, वाघ्या-मुरळी, बहुरूपी, दशावतार, दंडार, खडी गंमत, वासुदेवाची गाणी, भेदिक, लावणी, सोंगे, लळीत, सत्यशोधकी व आंबेडकरी जलसे आणि झाडीबोली रंगभूमी, नौटंकी, अशी विधीनाट्ये अस्तित्वात असून या लोककला प्रकारांमध्ये, तसेच तमाशांमध्येही आधुनिक वगनाट्ये, नाट्यलेखन व सादरीकरण यांना वाव राहिला. त्या सर्वांचा आधार दोन मराठी नाट्य संमेलनात एकपात्री प्रयोग, एकांकिका व नाट्यप्रयोग सादर होतात.

तमाशा, जलसा आणि दलित रंगभूमी या तिन्ही कला प्रकारांना मराठी रंगभूमीने जतन केले आहे. आजच्या नाट्यसंगीताच्या जडणघडणीच्या उगमाशीच लावणीचे नाते होते. नाट्यसंगीत आणि लावणी या दोन्ही कलांना संगीत नाटक जवळचे आहे. अजूनही आपल्या संगीत नाटकांत न आलेले लोकसंगीत कला प्रकारांचा शोध घेणे व त्यांना नवा अर्थ प्राप्त करून देणे संगीतकार व रंगकर्मी यांच्यापुढे आव्हान ठरते. त्याशिवाय आणखी एक म्हणजे, लोककलेच्या माध्यमातून विकसित झालेली, लोकनाट्याचा महान वारसा लाभलेली दलित रंगभूमी व नाट्य चळवळ, आधुनिक मराठी रंगभूमीचा मूलाधार असून, पश्चिमी नाट्य परंपरेपेक्षाही हा धागा योग्य आणि संयुक्तिक मानला जातो. त्या अर्थाने मराठी नाट्यसंमेलने या बरोबर अलीकडील काळात लोककला संमेलनांचेही आयोजन करण्यात येते. मराठी मातीतून अंकुरलेल्या दलित रंगभूमीशी संबंधीत लोककला यांनी मराठी रंगभूमीला प्रतिष्ठा, स्थैर्य व सार्मथ प्राप्त करून दिले. तसेच, आधुनिक मराठी नाटक आणि दलित रंगभूमी यांनाही लोकधर्मी लोककलेचा वारसा आहे. त्यातून पुढे तमाशाप्रधान वगनाट्यांचा उदय झाला. (उदा. विच्छा माझी पुरी करा, गाढवाचं लग्न)तसेच लोककलीय दृष्टिकोनातून लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे जांभूळ आख्यान, या सर्वच कलाकृतींना नाट्य संमेलनात स्थान मिळाले आहे याकडे लक्ष वेधता येते.

आजही मराठी नाट्य संमेलनात किरवंत, गांधी-आंबेडकर, वाटा-पळवाटा, खेळिया, देवनवरी, तनमाजोरी, कारान, झुलवा, घोटभर पाणी इत्यादी दलित संवेदनेशी संबंधीत कलाकृती सादर झाल्या आहेत. या शिवाय प्रा. दत्ता भगत हे दलित नाट्य संमेलन आणि मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. सूर्यास्त, लोककथा-78, कन्यादान, पुरुष अशी काही दलित समस्येवरची नाटके असून त्यांचे प्रयोग व समीक्षा-चर्चा सुद्धा मराठी नाट्य संमेलनाच्या मंडपात झालेल्या आहेत. या सर्वच कलाकृती दलित रंगभूमी आणि मराठी नाट्य संमेलनात प्रकर्षाने रसिकांना भावल्या व चिंतनशील बनविण्यास कारणीभूत ठरल्या. प्रायोगिक आणि व्यावसायिक पातळीवरही या नाट्यकृतींना चांगले यश लाभले. म्हणूनच नोंद घेता येते. यातील मनोरंजनासह कलात्मक मूल्ये यांसह जीवन संघर्षाला नाट्यमय कलाटणी मिळते.

समग्र मानवी मूल्यांचे दर्शन यामधून घडताना माणसाला माणूस बनविणारी तथा महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवतावाद या मूल्यांची जोपासना करणारी आणि आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवणार्‍या कलाकृती म्हणूनही दखलपात्र ठरतात. ‘तृतीय रत्न’, ‘सत्यशोधक’ आणि ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, या विद्रोही कलाकृती म्हणून मान्यता पावताना मराठी रंगभूमीने स्वीकारल्या व त्यांना अलीकडील नाट्य संमेलनात स्थान दिले आहे. फुले-आंबेडकरांच्या परिवर्तनशील विचारच आपण सर्वांनी स्वीकारून पुरोगामित्व तथा सामाजिक बांधिलकी स्वीकारल्याचे सिद्ध होते. दलित रंगभूमीला अपेक्षित असलेली हीच ती वैचारिक क्रांती होय.

काही वर्षांपूर्वी प्रस्थापित आणि दलित रंगभूमीवर वैचारिक संघर्षाचे सर्मथ नाटक म्हणून प्रेमानंद गज्वी यांच्या ‘गांधी-आंबेडकर’ या नाटकाचा उल्लेख करण्यात आला. यापुढचे पाऊल म्हणजे बोधी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून ‘कोण म्हणतं टक्का दिला..’, ‘जात नाही ती जात’ यांसारख्या अपरिचित, अनोळखी विषयांवरील नाट्यकृतींनीसुद्धा बोधी नाट्य महोत्सवाबरोबरच मराठी रंगभूमी तथा नाट्य संमेलनातही आपली दखल घेण्यास भाग पाडले आणि मराठी रंगभूमीची कोंडी फोडली. म्हणून जीवनानुभवाशी अस्सल नाते सांगणार्‍या या कलाकृती दलित संवेदनेशी नाते सांगत मराठी नाट्य संमेलनाशीही जवळीक ठेवून राहिल्या. त्यायोगे मराठी नाट्य चळवळ गतिमान, सर्वव्यापी, सर्वस्पश्री होण्यास उपकारक ठरल्या हेही तितकेच खरे आहे.

श्रीमती विठाबाई नारायणगावकर यांच्यासारख्या लोककलावंतांनी तमाशा-लावणीच्या माध्यमातून मराठी रंगभूमीची सेवा केली व नाट्य रसिकांना रिझवले. ही सुद्धा दलित रंगभूमीची देणगीच होय. प्रबुद्ध रंगभूमी, विद्रोही रंगभूमी, फुले-आंबेडकरी रंगभूमी यांतील सर्वंकष परिवर्तनाचा विचारच मराठी नाट्य संमेलनात विविध उपरोक्त नाट्य कृतींतून आविष्कृत होत आहे. आंबेडकरी चळवळीतील नावाजलेले नाटककार सर्वश्री भि. शि. शिंदे, रामनाथ चव्हाण, प्रेमानंद गज्वी, प्रा. दत्ता भगत यांचे नाट्य लेखन व इतर मान्यवर रंगकर्मींचे कर्तृत्वही उपकारक ठरले. झुलवा हे नाटकसुद्धा घाशीराम कोतवालानंतरचे अखिल भारतीय स्तरावरचे महत्त्वाचे नाटक समजले जाते.


mgmokashi@gmail.com