आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसारातील मानवी जीवाला शिव बनवणारे व्रत : महाशिवरात्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माघ वद्य चतुर्दशीची रात्र म्हणजे शिवरात्र. या रात्री भगवान शंकराची पूजा केली असता अकाली व अपमृत्यूचे निवारण, रोगनिवारण, दीर्घायुष्य व जीवाला शिव लोकाची प्राप्ती होते, असे भक्त मानतात. विश्वाला प्रिय असणारा नाथ म्हणजे भोळ्या शंकरापासून मनुष्यप्राण्याला कौटुंबिक, सामाजिक, नैतिकमूल्यांची शिकवण मिळते. भगवान शंकर यांनी समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष स्वत: प्राशन करून देवदेवतांना अमृत दिले, अशी अख्यायिका सांगितली जाते.


आजच्या काळात अर्थ लावताना कुटुंबकर्ता, समाजधुरीण असो की देशाचा नेता, त्याचे कर्तव्य शंकराप्रमाणेच असावे. त्यांनी स्वत: कष्ट, पर्शिम घेऊन समाज उत्थनासाठी झटले पाहिजे. समाजमनात मत्सर, राग, परस्परांबद्दल वैरत्वाची भावना दिवसेंदिवस वाढत आहे. जगाच्या कल्याणासाठी विष प्यायला मागे पुढे न पाहणारे भगवान शंकर आज समाजातून, देशातून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. भगवान भोलेनाथाच्या छत्रछायेखाली सर्वजण गुण्यागोविंदाने, सुखशांतीने राहतात. परंतु आपण सर्व आपआपल्या कुटुंबात राहणारी माणसे सम असताना आपआपल्यात एकमेकांविषयी वैरभाव निर्माण होतो. अशावेळी घरच्या स्वामीला शंकराप्रमाणे दया, क्षमा व अहिंसा यांचे महत्त्व जर पटू लागले तर त्या घरात कुटुंबात वैरभावनेला अजिबात थारा मिळणारच नाही.


शिवशंकराबद्दल यजुर्वेदात नम: शंभवाच च मयोभवाच नम: शंकराय च, मयस्कराय च, नम: शिवाय च शिवतरायच ॥ असे म्हटले आहे. म्हणजेच शिवशंकराला शिवस्वरूप, कल्याणकारक व मोक्ष देणारा असे म्हटले आहे. अशा शंभू महादेवाचे पूजन फक्त बेलाचे पान, फुले, फळे, धूप, दीप, नैवेद्य आदी उपचारांनी अत्यंत भक्तिपूर्वक करतात. त्याकरिता तामसी पदार्थाचा उपयोग नसावा. कवठ, धोत्रा, अक्षता, बेलाची पाने, दूध, तूप मधसाखर किंवा शुद्धजल अर्पण करतात. शिवनामस्मरणानेसुद्धा शिव भक्तांवर प्रसन्न होतो. मानवी जीवनातील रोजची रात्र ती नित्यशिवरात्र, शुद्ध चतुर्दशीची ती पक्षशिवरात्र, महिन्याचे मास शिवरात्र, योगियांची रात्र ती योगशिवरात्र, तर वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्री. या दिवशी सकाळी स्नान करून व्रताचा संकल्प करावा. दिवसभर उपवास करून पुन्हा स्नानानंतर षोडोपचारे शिवपूजा करावी. म्हणजेच उपवास, भजन, जागरण ही महाशिवरात्रीची तीन अंगे आहेत. अशा प्रकारे संकटात सापडलेल्या जीवाला शिव (कल्याण) व्हायचं असेल तर अनाथांचा नाथ, भक्त रक्षक, त्रिलोचनाथ, श्रीनीलकंठाय, भस्मांग रागाय, महेश्वराय, शिवशंकराची पूजा मनोभावे करून भयमुक्त, रोगमुक्त, दारिद्रय़मुक्त, संकटमुक्त होऊन दीर्घायुष्यी व्हावे.


श्री वीरतपस्वी मंदिरातील कार्यक्रम
अक्कलकोट रोडवरील श्री चन्नवीर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त गुरुवारी दुपारी 3.00 वाजता डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींची शिवलिंग महापूजा होणार आहे. बाळीवेसमधील श्रीबृहन्मठ होटगी मठात सकाळची महापूजा, महामंगलारती. नंतर बाळीवेस मठ ते श्री वीरतपस्पवी चन्नवीर मंदिर एमआयडीसी अक्कलकोट रोड या दरम्यान रथोत्सव निघेल. त्यानंतर यात्रेची सांगता श्री वीरतपस्वी चन्नवीर मंदिर एमआयडीसी अक्कलकोट रोड येथे शिवाचार्य वर्गाच्या उपस्थितीत होईल. यानंतर भक्तजनांना महाप्रसाद. रात्री शिवभजन नामसंकीर्तन, जागरण असे कार्यक्रम होतील.